नाशिक – कळवण विधानसभा मतदारसंघातून माकपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणारे माजी आमदार जिवा पांडू गावित हे सुमारे चार कोटींचे धनी आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी दिंडोरी मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. सहा महिन्यांत गावितांच्या मालमत्तेत २५ ते ३० लाखाची भर पडली आहे.

हेही वाचा – नाशिक मध्य, नाशिक पश्चिम अखेर ठाकरे गटाकडे; डॉ. हेमलता पाटील बंडखोरीच्या तयारीत

हेही वाचा – अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम

कळवण-सुरगाणा मतदारसंघात गावित यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक-मुंबई पायी मोर्चा काढणाऱ्या गावितांकडे १९ लाखांची इनोव्हा मोटार आहे. व्यवसायाने शेतकरी असणाऱ्या गावितांची मालमत्ता पाच वर्षांत जवळपास एक ते सव्वाकोटीने वाढल्याचे याआधी समोर आले होते. सद्यस्थितीत त्यांच्याकडे दोन कोटी ६३ लाख ७५ हजार रुपयांची चल संपत्ती आहे. त्यांच्या स्थावर मालमत्तेचे (अचल) आजचे बाजारमूल्य एक कोटी सात लाखहून अधिक आहे. गावितांकडे एक लाख १० हजार रुपयांचे दागिने असताना पत्नीकडे एक रुपयाचाही दागिना नाही. विविध बँकांमध्ये सुमारे दोन कोटींची रक्कम आहे. सुरगाणा तालुक्यातील पाच ते सहा गावांत ४७ एकर शेतजमीन आणि सुरगाणा येथे भूखंड त्यांच्या नावावर आहे. गावितांवर सात वेगवेगळे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. एका प्रकरणात त्यांना तीन हजार रुपयांचा दंड अथवा दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा झाली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी साडेतीन कोटींचे धनी असणारे गावित सहा महिन्यांत तीन कोटी ९० लाखाची मालमत्ता बाळगून आहेत.

Story img Loader