जळगाव : इस्रायलमध्ये घरगुती काळजीवाहक (होम बेस्ड केअरगिव्हर) पदाच्या तब्बल ३५०० जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून, भारतातील पात्र महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (एनएसडीसी) समन्वयातून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, तर निवड इस्रायली नियोक्त्यांकडून केली जाणार आहे. या माध्यमातून आकर्षक वेतन, मोफत निवास, वैद्यकीय सुविधा आणि दीर्घकालीन रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.
घरगुती काळजीवाहक भरतीमध्ये महिलांना ९० टक्के, तर पुरुषांना १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. अर्जदारांचे वय २५ ते ४५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक असून उमेदवाराची उंची किमान १.५ मीटर व वजन किमान ४५ किलो असणे बंधनकारक करण्यात आले आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून इंग्रजी भाषेचे मध्यम ज्ञान अपेक्षित आहे.
उमेदवारांकडे केअरगिव्हर प्रशिक्षणाचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराने ‘ऑन जॉब ट्रेनिंग’सह किमान ९९० तासांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. याशिवाय परिचारिका, भौतिकोपचार किंवा सुईणकाम संबंधित मान्यताप्राप्त डिप्लोमा पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जदाराकडे किमान तीन वर्षे वैध असलेला पासपोर्ट असणेही आवश्यक आहे.
कामाचे स्वरुप असे असेल
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे १ लाख ९९ हजार ७७० रुपये वेतन मिळणार असून त्यासोबत निवास, अन्न व वैद्यकीय विम्याची सुविधाही नियोक्त्याकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. उमेदवारांना आठवड्यातून सहा दिवस ‘लाईव्ह-इन केअरगिव्हर’ म्हणून काम करावे लागेल. वृद्ध, अपंग तसेच विशेष गरजा असलेल्या व्यक्तींची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. कामाच्या स्वरूपात रुग्णांना आंघोळ घालणे, कपडे बदलणे, औषधे देणे, स्वयंपाक करणे, साफसफाई, खरेदी तसेच दैनंदिन हालचालींमध्ये मदत करणे या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे. उमेदवारांना दरवर्षी १६ दिवसांची रजा आणि ९ धार्मिक व राष्ट्रीय सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे. कराराचा कालावधी दोन वर्षांचा असून तो पुढे नूतनीकरणीय राहणार आहे.
उमेदवारांसाठी या अटी
भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ज्या उमेदवारांनी सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी परदेशात वास्तव्य केले आहे, त्यांना संबंधित देशातील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. निवड प्रक्रिया ऑनलाइन आणि व्हिडिओ चित्रीत मुलाखतीद्वारे पार पडणार आहे. अंतिम निवड इस्रायली नियोक्त्यांकडून केली जाणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारांनी यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे. तसेच उमेदवाराचे पती किंवा पत्नी, पालक अथवा मुले सध्या इस्रायलमध्ये वास्तव्यास किंवा नोकरीत नसावीत, अशी अट घालण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी उमेदवारांना नोंदणी शुल्क, वैद्यकीय तपासणी, पोलीस पडताळणी, व्हिडिओ मुलाखत शुल्क, व्हिसा प्रक्रिया आणि विमान प्रवासाचा खर्च स्वतः करावा लागणार आहे.
माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?
प्रारंभिक खर्च सुमारे १.४७ लाख रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी maharashtrainternational.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच जळगाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत भेट द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप गायकवाड यांनी केले आहे.
