जळगाव : जिल्ह्यातून खाटू श्याम तसेच अजमेर दर्गाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत असल्याने, रेल्वे प्रशासनाने काकीनाडा–हिसार दरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लक्षात घेता ही विशेष रेल्वे गाडी आता नियमित सेवेच्या रुपात धावणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
खान्देशातील भाविकांसाठी खाटू श्याम आणि अजमेर दर्गा दर्शनाचा प्रवास आता अधिक सुलभ झाला आहे. पूर्वी दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी बस किंवा अनेक रेल्वे गाड्या बदलण्याची गरज भासत होती; मात्र काकीनाडा–हिसार स्वतंत्र रेल्वे सुरू झाल्याने प्रवासाचा वेळ, खर्च आणि त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कुटुंबांसाठी ही रेल्वे सेवा अधिक सोयीची ठरत असून, नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. भुसावळ व जळगाव स्थानकांबरोबरच धरणगाव आणि अमळनेर येथेही या गाडीला थांबा असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या नव्या सेवेमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळत असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही त्याचा सकारात्मक फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
रेल्वेने काकीनाडा टाऊन आणि हिसार दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्या नियमित केल्या आहे. या गाड्या आता नवीन क्रमांकांसह नियमित गाड्या म्हणून चालवल्या जातील, ज्यामुळे प्रवाशांची सोय वाढेल आणि कामकाज अधिक सुव्यवस्थित होईल. सध्या कार्यरत असलेल्या ०७७१७/०७७१८ काकीनाडा टाऊन ते हिसार साप्ताहिक विशेष गाड्यांचे नियमित सेवेत रुपांतर झाल्यानंतर १७२९५ काकीनाडा टाऊन ते हिसार साप्ताहिक एक्स्प्रेस १२ मेपासून काकीनाडा टाऊन येथून तसेच गाडी क्रमांक १७२९६ हिसार ते काकीनाडा टाऊन साप्ताहिक एक्स्प्रेस १५ मेपासून हिसार येथून धावणार आहे.
पैकी १७२९५ एक्स्प्रेस दर मंगळवारी काकीनाडा टाऊन येथून ०५.४० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी हिसार येथे १०.२० वाजता पोहचेल. १७२९६ एक्स्प्रेस दर शुक्रवारी हिसार येथून दुपारी ०२.१० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी काकीनाडा टाऊन येथे रात्री ०९.३५ वाजता पोहचेल. दोन वातानुकूलित प्रथम, तीन वातानुकूलित द्वितीय, पाच वातानुकूलित तृतीय, आठ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅन, अशी डब्यांची रचना असेल.
दोन्ही बाजूने सामलकोट, राजमुंद्री, तादेपल्लीगुडम, एलुरु, विजयवाडा, गुटूर, मिरयालगुडा, नालगोंडा, चार्लापल्ली, मेडचल, कामारेड्डी, निझामाबाद, बासर, धर्माबाद, हजूर साहिब नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, शेगांव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नंदुरबार, उधना, वडोदरा, रतलाम, मंदसोर, नीमच, चित्तौरगढ, भिलवारा, बिजेनगर, नासिराबाद, अजमेर, किशनगढ, फुलेरा, रींगस जंक्शन, सिकर, नवलगढ, झुनझुनू, चिडावा, लोहारू, सदूलपूर स्थानकांवर थांबा असेल.
