जळगाव : प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेत रेल्वे प्रशासनाने काकीनाडा टाउन–हिसार–काकीनाडा टाउन एक्स्प्रेसमध्ये (१७२९५/१७२९६) मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. काकीनाडा टाउन येथून ५ जानेवारी २०२७ पासून, तर हिसार येथून ८ जानेवारी २०२७ पासून ही गाडी नव्या बदलासह धावणार आहे.

काकीनाडा टाउन–हिसार–काकीनाडा टाउन गाडीच्या डब्यांच्या रचनेत एकूण २२ डब्यांचा समावेश असेल. त्यामध्ये प्रथम श्रेणी वातानुकूलित (१ एसी) एक, द्वितीय श्रेणी वातानुकूलित (२ एसी) तीन, तृतीय श्रेणी वातानुकूलित (३ एसी) पाच, शयनयान श्रेणीचे सात, सामान्य श्रेणीचे चार आणि दोन पॉवर कार अशा डब्यांचा समावेश आहे. काकीनाडा टाउन येथून सुटणाऱ्या गाडीला ५ जानेवारी २०२७ पासून एलएचबी डबे जोडण्यात येतील. तर हिसार येथून सुटणाऱ्या गाडीचे ८ जानेवारी २०२७ पासून एलएचबी रेकसह संचालन केले जाणार आहे. त्यामुळे दोन्ही दिशांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधुनिक डब्यांची सुविधा मिळणार आहे.

एलएचबी डब्यांमुळे प्रवास अधिक सुरक्षित

एलएचबी डब्यांची रचना प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक प्रगत मानली जाते. या डब्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, प्रवासादरम्यान होणारे धक्के आणि आवाज कमी होण्यास मदत होते. तसेच पारंपरिक आयसीएफ डब्यांच्या तुलनेत एलएचबी डब्यांची रचना अधिक सुरक्षित असून, प्रवाशांना प्रवासाचा चांगला अनुभव मिळण्यास मदत होते.

उत्तर महाराष्ट्रात पाच स्थानकांवर थांबा

काकीनाडा टाउन–हिसार एक्स्प्रेसला उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर आणि नंदुरबार या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे आहेत. त्यामुळे या भागातील प्रवाशांसाठी ही गाडी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. एलएचबी रेकमुळे या मार्गावरील प्रवाशांना आधुनिक रेल्वे डब्यांमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

इतर गाड्यांनाही एलएचबी रेकची अपेक्षा

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने स्वागत केले आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि प्रवासातील आरामदायी सुविधा लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा सकारात्मक निर्णय असल्याचे मंडळाचे अध्यक्ष महेंद्र शिवराज कोठारी यांनी सांगितले. केवळ या एका गाडीपुरतेच मर्यादित न राहता उत्तर महाराष्ट्रातून धावणाऱ्या इतर महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांनाही टप्प्याटप्प्याने एलएचबी रेक उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा कोठारी यांनी व्यक्त केली. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतानाच प्रवासातील सुविधा आणि गाड्यांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशासनाने अशा निर्णयांची व्याप्ती वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.