नाशिक – कळवण तालुक्यातील विविध आश्रमशाळांमधील तब्येत बिघडलेल्या २४ विद्यार्थ्यांना एकाच दिवशी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने आश्रमशाळांमधील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला तसेच संसर्गजन्य आजारांची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कळवण तालुक्यातील निवाणे, विसापूर, मानूर, मोहनदरी आणि नाकोडे येथील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये इयत्ता पहिलीपासून नववीपर्यंतच्या मुला-मुलींचा समावेश आहे. अचानक मोठ्या संख्येने विद्यार्थी रुग्णालयात दाखल झाल्याने रुग्णालय परिसरातही काही काळ गर्दी झाली.

शुक्रवारी सकाळी विसापूर आश्रमशाळेतील आठ वर्षांच्या सृष्टी सूर्यवंशी या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर आदिवासी विकास प्रशासन खडबडून जागे झाले. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जाते का, त्यांची वेळेवर वैद्यकीय तपासणी होते का आणि आजारी विद्यार्थ्यांना उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल केले जाते का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण घेत असल्याने त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी, आजारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि आवश्यकतेनुसार तातडीने उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, तसेच ताप, सर्दी, खोकला अथवा संसर्गजन्य आजारांची लक्षणे दिसून आल्यास संबंधित विद्यार्थ्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करून आवश्यक उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या सूचनांनंतर विविध आश्रमशाळांमधून आजारी विद्यार्थ्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, दिवसभरात एकूण २४ विद्यार्थी उपचारासाठी दाखल झाले.

दरम्यान, सृष्टी हिचा मृत्यू तापामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर शवविच्छेदन व अंतिम वैद्यकीय अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये यांनी दिली.

‘पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही’

विसापूर आश्रमशाळेतील २४ विद्यार्थ्यांना सर्दी, ताप, खोकला या आजारांमुळे दाखल करण्यात आले आहे. हे सर्व आजार हवेतून होणारे आहेत. पावसाळ्यात हे आजार सहज होतात. सर्व विद्यार्थी सुस्थितीत असून पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच परिसरात वेगळा आजार पसरला आहे, अशी भीतीही मनात आणू नये. — डॉ. जनक पूरकर, बालरोगतज्ज्ञ, कळवण उपजिल्हा रुग्णालय