तृप्ती देसाई यांचा आरोप
शहरातील कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी प्रवेशासाठी केलेल्या आंदोलनाला गुरुवारी हिंसक वळण लागले. या प्रवेशास नाहक प्रसिध्दी देत असल्याचा आरोप करत महिलांच्या प्रवेशास विरोध करणाऱ्या पुरोहितांनी थेट प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला चढविला. यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या गदारोळात तृप्ती देसाई यांना बाहेर काढून बंदोबस्तात पुण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आले. आपण ब्राम्हण वा गुरव समाजाचे नसल्याचा जातीभेद करत मंदिर प्रवेशास विरोध करण्यात आल्याचे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
रामकुंडासमोरील बाजूस असणारे कपालेश्वर मंदिर जमिनीपासून काहीशा उंचावर आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी पायऱ्यांचा अरुंद मार्ग आहे. दुपारी दोन वाजता देसाई यांचे आगमन झाल्यानंतर सुरू झालेला गोंधळ सायंकाळपर्यंत सुरू होता. या काळात देवस्थानने महिलांच्या प्रवेशास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले. तथापि, पुजारी व गुरव मंडळींनी त्यास आक्षेप घेतला. पुजारी मंडळींनी गाभाऱ्यात ठाण मांडून प्रदोष पूजा सुरू केली. यावेळी मंदिरात छायाचित्रण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींवर उपस्थित जमावाने अचानक हल्ला चढवला. कॅमेरामनला धक्काबुक्की करण्यात आली. देवस्थानच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. या घटनाक्रमामुळे वातावरण बदलले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केल्यामुळे धावपळ उडाली. दरम्यानच्या काळात देसाई यांना सुरक्षितपणे बाहेर काढत पोलिसांनी त्यांना पुण्याच्या दिशेने मार्गस्थ केले. महिला-पुरूष समानतेच्या मुद्यावर भूमाता ब्रिगेड लढा देत असताना कपालेश्वर मंदिरात जातीभेद अनुभवयास मिळाल्याची तक्रार देसाई यांनी केली. मंदिर प्रवेशास विरोध करणाऱ्यांनी आपण ब्राम्हण अथवा गुरव समाजातील नाही आणि १६ संस्कारही झाले नसल्याचे कारण देऊन प्रवेश रोखल्याचे त्यांनी सांगितले.
((कपालेश्वर मंदिरात प्रवेशासाठी दाखल झालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई. ))

धुळे: सुरक्षारक्षकाला कोंडून मंदिरात चोरी; सात लाख रुपयांचा ऐवज लंपास