मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातर्फे आयोजित ‘राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन कर्मवीर काव्य करंडक २०२६’ स्पर्धा नुकतीच पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत नाशिकच्या पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट व कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयाने सांघिक सर्वसाधारण विजेतेपद पटकावत ‘कर्मवीर काव्य करंडका’वर आपले नाव कोरले आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील महाविद्यालयांनी दमदार सहभाग नोंदवला.
पुणे, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, औरंगाबाद, मुंबई, नागपूर यांसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून ६५ महाविद्यालयीन संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन गटांत ही स्पर्धा पार पडली. स्पर्धकांचा उत्साह आणि कवितांमधील सामाजिक जाणीव यामुळे संपूर्ण परिसर काव्यमय झाला होता. वरिष्ठ गटात पिंपळगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचा अक्षय जाधव याने २१ हजाराचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
नाशिकच्या पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचा विद्यार्थी करण काळे याने १५ हजाराचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. नाशिकच्या एल.व्ही.एच. महाविद्यालयाची अक्षदा तालखे हिने तृतीय क्रमांकाचे ११ हजाराचे बक्षीस पटकावले आहे. कनिष्ठ गटात नामपूर महाविद्यालयाची श्रद्धा धुमाळ, वडेल येथील उच्च माध्यमिक विद्यालयाची कावेरी मदने व नामपूर महाविद्यालयाचा गणेश अहिरे यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पाटील यांनी तरुण कवींशी संवाद साधला. कविता हे मनातील वास्तव मांडण्याचे साधन आहे. शंभर कविता लिहिण्यापेक्षा एका कवितेत शंभर कवितांची ताकद टाका, असा सल्ला त्यांनी यावेळी उदयोन्मुख कवींना मार्गदर्शन करताना दिला. कविता करताना सामाजिक वास्तवावर भाष्य करावे,वाचन आणि साधना वाढविल्यास या क्षेत्रात नक्कीच नावलौकिक वाढेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक अपूर्व हिरे हे होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त अद्वय हिरे हेही उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण जयश्री वाघ,राजेंद्र उगले व राजेश्वर शेळके यांनी केले. त्यांनी स्पर्धकांच्या सादरीकरणातील बारकाव्यांवर प्रकाश टाकत मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे जनरल सेक्रेटरी माजी मंत्री डॉ. प्रशांत हिरे, जनसंपर्क विभागप्रमुख डॉ. संपदा हिरे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उज्जन कदम, उपप्राचार्य डॉ. राजाराम शेवाळे आणि संपूर्ण प्राध्यापक वृंदाने स्पर्धेच्या यशासाठी विशेष परिश्रम घेतले.
