नाशिक – मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने (आरपीएफ) चोरट्यांची टोळी जेरबंद करीत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून होणाऱ्या चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. इगतपुरी – कसारा घाट विभागात ही टोळी सक्रिय होती. मध्यंतरी मंगला एक्स्प्रेसमध्ये चोरीची घडना घडली. सातत्याने घडणाऱ्या या घटना रोखण्यासाठी आरपीएफने कसारा घाट व लगतच्या डोंगराळ भागात संयुक्त मोहीम राबवत हे यश मिळवले.
मध्य रेल्वेच्या मुंबई-भुसावळ मार्गावरील कसारा घाट-इगतपुरी विभागात घडणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी कसारा व इगतपुरी येथील आरपीएफ कर्मचारी आणि गुन्हे प्रतिबंधक व शोध पथक, इगतपुरी रेल्वे पोलिसांचा समावेश असलेले संयुक्त पथक स्थापन केले. या पथकाने घाट आणि लगतच्या डोंगराळ भागात सक्रिय असलेल्या संशयास्पद व्यक्तींवर सातत्याने गुप्तपणे पाळत ठेवली.
१२ जानेवारी रोजी, कसारा घाट विभागात पाळत ठेवताना, आरपीएफ पथकाला संशयास्पद हालचाल आढळली आणि ट्रेन क्रमांक १२६१८ अप एर्नाकुलम- हजरत निजामुद्दीन मंगला एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाच्या सामानाची चोरी केल्याबद्दल दोन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. रवींद्र नामदेव धोगंडे (२६, खडवली) आणि करण भीमराव भालेराव (१९, आसनगाव) या संशयितांना अटक करण्यात आली.
चौकशीत कल्पेश कानू आरे (२४) नावाच्या एका साथीदाराला बलवंडी येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. संशयितांकडून चोरीला गेलेले मुद्देमाल जप्त करण्यात आला. ज्यामध्ये मंगळसूत्र, कानातले आणि नाकातले असे सोन्याचे दागिने आणि सहा भ्रमणध्वनींचा समावेश होता. वरील तीनही संशयितांना अटक केल्यानंतर प्रवाशांच्या सामानाची चोरी आणि चोरीचे अंदाजे पाच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी इगतपुरी रेल्वे पोलीस पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही करत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. इगतपुरी-कसारा दरम्यान घाटातील रेल्वे मार्गात तीव्र चढण आणि बोगदे आहेत. अतिरिक्त इंजिन जोडण्यासाठी तसेच सिग्नल मिळेपर्यंत रेल्वेगाड्यांना काही काळ थांबावे लागते. याचा फायदा चोरटे घेत असल्याची शक्यता वर्तविली जाते.
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधील प्रवासी गाठ झोपेत असताना त्यांचे साहित्य चोरीला जाण्याच्या घटना वाढत हो्त्या. या कारवाईने त्यास पायबंद लागण्याची आशा आहे. दरम्यान, रेल्वे प्रवासात प्रवाशांनी सतर्क रहावे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना द्यावी किंवा मदतीसाठी १३९ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

