नाशिक – आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेचे काम आणि कसारा यार्डमधील ‘अप’ यार्ड लाइनच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेकडून ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १२ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा परिणाम नाशिकमार्गे मुंबईकडे आणि मुंबईहून उत्तर भारताच्या दिशेने धावणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर होणार आहे. इगतपुरी येथे काही गाड्यांचे नियमन करण्यात येणार असून, काही गाड्यांना खर्डी आणि आटगाव येथे थांबवण्यात येणार आहे.
७ आणि ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३५ ते रात्री ८.३५ या वेळेत, तर ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५.३० या वेळेत कसारा परिसरात ब्लॉक असेल. त्यामुळे ब्लॉकच्या कालावधीत आसनगाव-कसारादरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाही.
नाशिकमार्गे धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, अयोध्या कँट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, बलिया-दादर एक्स्प्रेस आणि ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस यांचे इगतपुरी येथे नियमन करण्यात येणार आहे. याशिवाय दादर-गोरखपूर एक्स्प्रेसला खर्डी येथे एक तास, तर लोकमान्य टिळक टर्मिनस-राजगीर एक्स्प्रेसला आटगाव येथे ३० मिनिटे थांबवण्यात येणार आहे.
भुसावळ विभागात काही गाड्यांचे नियमन
भुसावळ विभागातही काही गाड्यांचे ३० मिनिटांपासून एक तास २५ मिनिटांपर्यंत नियमन करण्यात येणार आहे. गाड्यांचे नियमन आणि एकापाठोपाठ एक गाड्या आल्यामुळे साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत, कामायनी एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस यांसह अनेक गाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे.
काही गाड्यांच्या वेळेत बदल
८ ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणाऱ्या बनारस, पाटलिपुत्र आणि अमृतसर एक्स्प्रेसच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ९ ऑक्टोबर रोजी सुटणाऱ्या काही गाड्यांच्याही वेळेत बदल करण्यात आला आहे.
मार्गिकेची क्षमता वाढणार…
मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, आसनगाव-कसारा तिसरी मार्गिका प्रकल्पामुळे मेल-एक्स्प्रेस आणि उपनगरीय वाहतूक स्वतंत्र करण्यास मदत होणार असून भविष्यात मार्गिकेची क्षमता वाढविणे शक्य होईल. पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हे ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
