नाशिक : नाशिक रोड येथील काठे गल्ली तसेच द्वारका चौफुलीवर सोमवारी दुपारी विद्युत प्रवाह बंद झाल्याने वाहतूक नियंत्रण यंत्रणा बंद पडली. त्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ही कोंडी फोडण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मदत केली. या परिसरात कायमच अशी वाहतूक कोंडी होत असल्याने यावर उपाययोजनेसाठी वाहतूक विभागाने स्मार्ट सिटीकडे दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविला होता. परंतु अद्याप
याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
शहराचा वेगाने विस्तार होत असताना या ठिकाणी वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता शहर परिसरात वाहतूक विभागाच्या वतीने ठिकठिकाणी इलेक्ट्रिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा बसविण्यात आली आहे. सद्य:स्थितीत शहरात ५० ठिकाणी अशी यंत्रणा कार्यान्वित आहे. परंतु वेगवेगळय़ा कारणांमुळे काही ठिकाणी या व्यवस्थेत बिघाड होत राहतात. सोमवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास काठे गल्ली चौफुली येथील वाहतूक नियंत्रण यंत्रणा बंद पडली. यामुळे काठे गल्ली परिसरातील सह्याद्री रुग्णालयाकडून येणारा रस्ता, काठे गल्ली या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. नाशिक रोड रस्त्यावरील वाहतुकीवरही या कोंडीचा परिणाम झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काठे गल्लीपासून नासर्डी पुलापर्यंत वाहनांची रांग लागली होती. हीच परिस्थिती द्वारका चौफुलीवर होती. परिसरातील नागरिकांनी बाहेर येत ही वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. काही वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला. काही वेळातच याबाबत वाहतूक पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त एस. गायकवाड यांनी दिली.
शहरातील वाहतूक यंत्रणा अद्ययावत होणार
शहर परिसरात ५० ठिकाणी इलेक्ट्रिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा आहे. ही सर्व यंत्रणा अद्ययावत व्हावी यासाठी नाशिक स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनकडे साधारणत: दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. स्मार्ट रोड असलेल्या सीबीएस-मेहेर रस्त्यावरील स्मार्ट वाहतूक यंत्रणेप्रमाणे सर्व ठिकाणी स्मार्ट यंत्रणा बसवावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत कुठे कुठे अत्याधुनिक यंत्रणा बसवावी याची ठिकाणे दिली आहेत. स्मार्ट सिटीने स्वत: अशी ४१ ठिकाणे निवडली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम थांबले आहे. पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती स्मार्ट सिटी योजनेच्या वतीने देण्यात आली.
