जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या, प्रवासातील सोयीसुविधांची गरज आणि विशे। गाडीच्या अधिक भाड्याचा प्रश्न लक्षात घेता दादर–भुसावळ एक्सप्रेसचे खान्देश एक्स्प्रेसमध्ये विलीनीकरण करून खान्देश एक्सप्रेस आठवड्यातील सातही दिवस नियमितपणे सुरू करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे डीआरयूसीसी सदस्य तथा धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.
सध्या खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस धावत असून उर्वरित एका दिवशी दादर–भुसावळ विशेष एक्स्प्रेस चालविली जाते. या दोन्ही गाड्यांच्या संचालनामध्ये महत्त्वाचे साम्य हे आहे, की विशेष गाडीही खान्देश एक्स्प्रेसच्याच रेकचा वापर करून चालविली जाते. त्यामुळे स्वतंत्र विशेष गाडी चालविण्याऐवजी तिचे नियमित खान्देश एक्स्प्रेसमध्ये विलीनीकरण केल्यास प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि परवडणारी रेल्वेसेवा उपलब्ध होऊ शकते, असा मुद्दा निवेदनातून मांडण्यात आला आहे.
जादा भाड्यातून सुटका होणार
सध्या १९००३/१९००४ खान्देश एक्स्प्रेसला नियमित गाडीचे भाडे आकारले जाते; मात्र ०९०४९/०९०५० दादर–भुसावळ विशेष एक्स्प्रेसचे भाडे नियमित गाडीच्या तुलनेत सुमारे २० ते २५ टक्क्यांनी अधिक आहे. एकाच रेकचा वापर होत असताना प्रवाशांना विशेष गाडीच्या नावाखाली जादा भाडे मोजावे लागत असल्याने आर्थिक भार सहन करावा लागतो. त्यामुळे विशेष गाडीचे खान्देश एक्स्प्रेसमध्ये विलीनीकरण केल्यास प्रवाशांची जादा भाड्यातून सुटका होऊन नियमित दरात प्रवास करणे शक्य होईल.
नियमित रेल्वेसेवेची मोठी गरज
उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे तसेच मुंबईहून खान्देशातील विविध शहरांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि अन्य कामांसाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना नियमित रेल्वेसेवेची मोठी गरज असते. सध्या खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून केवळ सहा दिवस उपलब्ध असल्याने एका दिवसाच्या प्रवासाचे नियोजन करताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे दादर–भुसावळ विशेषचे विलीनीकरण करून खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातील सातही दिवस चालविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तीन अतिरिक्त डबे वाढविण्याची मागणी
केवळ गाडीच्या फेऱ्या वाढवून प्रवाशांची समस्या पूर्णपणे सुटणार नाही, तर गाडीतील आसन क्षमताही वाढविणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. खान्देश एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दोन अतिरिक्त जनरल डबे आणि एक अतिरिक्त स्लीपर डबा जोडण्यात यावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह आरक्षित स्लीपर वर्गातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळू शकतो. एकूण तीन अतिरिक्त डब्यांमुळे गाडीची प्रवासी क्षमता वाढण्यास मदत होईल. विशेषतः सण-उत्सव, सुट्ट्या आणि गर्दीच्या कालावधीत प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या अंतिम निर्णयाकडे लक्ष
महेंद्र कोठारी यांनी मांडलेल्या मागण्यांना पश्चिम रेल्वे मुख्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे खान्देश एक्स्प्रेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ, विशेष गाडीचे नियमित गाडीत विलीनीकरण आणि अतिरिक्त डब्यांची उपलब्धता या विषयांवर रेल्वे प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे. रेल्वे प्रवाशांसाठी ही मागणी केवळ गाडीच्या फेऱ्या वाढविण्यापुरती मर्यादित नसून नियमित सेवा, किफायतशीर प्रवास आणि वाढीव प्रवासी क्षमता या तिन्ही बाबींसाठी महत्त्वाची आहे. रेल्वे प्रशासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातील सातही दिवस सुरू करावी आणि तीन अतिरिक्त डबे जोडण्यास मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.
