जळगाव : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी घेण्यात आला होता. त्या निर्णयाचे काय झाले, असा प्रश्न विधान परिषदेच्या कामकाजात उपस्थित झाल्यानंतर राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीवरुन जळगाव ते छत्रपती संभाजीनगर ‘खान्देश एक्सप्रेस वे’ समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी हालचाली वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव ते छत्रपती संभाजीनगर तसेच चाळीसगाव ते कन्नड या मार्गांवरील वाहतूक अधिक वेगवान आणि सोयीस्कर करण्यासाठी नागपूर येथे गेल्या वर्षी जून महिन्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, खासदार स्मिता वाघ, आमदार देवयानी फरांदे आणि आमदार मंगेश चव्हाण आदी मान्यवरही उपस्थित होते.
सध्या जळगावहून अजिंठा, सिल्लोड मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचण्यासाठी सुमारे दोन ते अडीच तासांचा कालावधी लागतो. समृद्धी महामार्गाशी जोडण्यापूर्वी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास केवळ एका तासावर आणण्याचा निर्णय देखील त्या बैठकीत घेण्यात आला होता.
तर पुणे, मुंबई हाकेच्या अंतरावर
छत्रपती संभाजीनगरहून समृद्धी महामार्गाद्वारे मुंबई गाठण्यासाठी सध्या सुमारे चार तास लागतात. त्यामुळे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास एका तासात पूर्ण झाल्यास पुढील चार तासांचा प्रवास धरून जळगावहून मुंबई अवघ्या पाच तासांत गाठणे शक्य होणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच मुंबईदरम्यानची दळणवळण व्यवस्था अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे, पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान प्रस्तावित असलेल्या एक्सप्रेस हायवेमुळे जळगावहून पुणे शहराकडे देखील कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. जळगावहून धुळे, मालेगाव, नाशिकमार्गे मुंबईला जाण्यासाठी वाढत्या रहदारीमुळे किमान सात ते आठ तासांचा वेळ लागतो. मात्र, जळगावहून छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्यास मुंबईला पोहोचण्याची वेळ तीन ते चार तासांनी कमी होऊ शकणार आहे.
‘खान्देश एक्सप्रेस वे’ असे नाव
दरम्यान, जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग सहापदरी केव्हा करणार, असा प्रश्न विधान परिषदेत नुकताच उपस्थित झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी या प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती मागितल्यानंतर राज्य सरकारकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली. जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा १०५ किलोमीटर लांबीचा ‘खान्देश एक्सप्रेस वे’ थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. सध्या या प्रस्तावित महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. डीपीआरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरूवात करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.
