नाशिक – शहरातील इंदिरानगर भागातून अपहरण झालेले गजरा उद्योग समुहाचे संचालक तथा प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांची सुमारे दोन कोटींची खंडणी घेतल्यानंतरच अपहरणकर्त्यांनी गुजरातमध्ये सुखरुप सुटका केल्याचे तपासात उघड झाले आहे. पारख यांच्या वाडिवऱ्हेतील जागेत सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा आणि या भागातील राजस्थानी ढाबा चालकाने मिळून या अपहरणाचा कट रचला. त्यासाठी राजस्थानातील सराईत गुन्हेगाराची मदत घेतली. शहर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास लावत राजस्थानातील भारत-पाकिस्तान सीमेवरील वाळवंटातील एका वस्तीतून खंडणीतील एक कोटी ३३ लाखांची रोकड, गुन्ह्यात वापरलेले वाहन, गावठी बंदुक आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत केली.
शहर गुन्हे शाखेच्या गट एकने ही कामगिरी केली. सलग काही दिवस परराज्यात तळ ठोकून पोलिसांनी या प्रकरणाचा यशस्वी तपास केला. याबाबतची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्रध्दा कॉलनी भागात वास्तव्यास असणारे बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख (५१) यांचे दोन सप्टेंबरच्या रात्री घराच्या परिसरातून अपहरण झाले होते. चारचाकी आणि दुचाकीवर आलेल्या संशयितांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले होते. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. दोन पथके परराज्यात पाठविली. दुसऱ्या दिवशी अपहरणकर्त्यांनी पारख यांना गुजरातमध्ये सोडून दिले. ते सुखरुप घरी परतले. त्यामुळे या अपहरण नाट्याचे गूढ अधिकच वाढले होते. पोलिसांसमोर हे गूढ उकलण्याचे आव्हान होते.




हेही वाचा >>>नाशिक: एकलहरे परिसरात बिबट्या जेरबंद
इगतपुरी तालुक्यातील वाडिवऱ्हे भागात पारख यांची जागा आहे. तिथे कार्यरत सुरक्षारक्षकाचा मुलगा अनिल खराटे (२५, लहांगेवाडी, वाडिवऱ्हे) आणि वाडिवऱ्हे भागातील ढाबा चालविणारा महेंद्र उर्फ नारायणराम बिष्णोई (३०, मूळ मोर्या, जोधपूर, राजस्थान) यांनी पारख यांचे अपहरण करून खंडणी उकळल्याचे उघड झाले. त्यासाठी त्यांनी राजस्थानातील सराईत गुन्हेगारांची मदत घेतली. संशयितांच्या शोधार्थ गुन्हे शाखा गट एकचे पथक राजस्थानला गेले होते. पथकाने तीन दिवस तळ ठोकून महेंद्र बिष्णोई, पिंटू उर्फ देविसिंग राजपूत (२९, राजेंद्रनगर, राजस्थान), रामचंद्र बिष्णोई (२०, फुलसरा, बिकानेर, राजस्थान) यांना ताब्यात घेतले. संशयितांनी वाडिवऱ्हेतील अनिल खराटे याच्या सांगण्यावरून हा कट रचल्याची कबुली दिली. पारख यांच्याबाबतची इत्यंभूत माहिती खराटेने संबंधितांना दिली होती. खराटेला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी अटक केलेल्या चार संशयितांना न्यायालयाने १५ सप्टेंंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अपहरणाच्या प्रकरणात आणखी तीन जणांचा सहभाग असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक सिताराम बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, रणजित नलावडे, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक चेतन सावंत, विष्णू उगले आदींच्या पथकाने केली.
हेही वाचा >>>नाशिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सूर्यकांत रहाळकर यांचे निधन
अपहरणकर्त्यांचे डावपेच
बांधकाम व्यावसायिक पारख यांचे अपहरण केल्यानंतर अपहरणकर्ते दोन गटात विभागले गेल्याचे सांगितले जाते. एक गट बोलेरो वाहनातून अपहृत पारख यांना गुजरातच्या दिशेने घेऊन गेला. दुसऱ्या गटाने शहराबाहेर खंडणीची रक्कम स्वीकारली. हे पैसे कुणी, कसे दिले याबाबत स्पष्टता झालेली नाही. पारख यांच्या सुरक्षिततेसाठी आर्थिक व्यवहार झाल्याची कल्पना कुटुंबियांनी दिली नसल्याची शक्यता आहे. अपहरणकर्त्याच्या एका गटाने दोन कोटींची रक्कम स्वीकारल्यानंतर दुसऱ्या गटाने पारख यांची गुजरातमध्ये सुटका केली. गुन्ह्याची उकल झाल्यानंतर या अपहरण नाट्यात खंडणी घेतल्याचे समोर आल्याचे पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात आले.
भारत-पाक सीमेपर्यंत धाव
अपहरणकर्त्यांचा माग काढत शहर पोलीस पथक थेट राजस्थानच्या फलोदी जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवरील वाळंवटी प्रदेशात पोहोचले. निर्मनुष्य प्रदेशातील एका वस्तीतून खंडणी स्वरुपात उकळलेल्या रकमेपैकी एक कोटी ३३ लाखाची रोकड, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो, गावठी बंदूक, सहा जिवंत काडतुसे असा सुमारे एक कोटी ४१ लाख ३२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस पथकात अधिकाऱ्यांसमवेत उपनिरीक्षक रवींद्र बागूल, हवालदार नाजीम पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, विशाल मरकड, राहुल पालखेडे, योगेश चव्हाण या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.