किरीट सोमय्या यांचा आरोप
अशोका बिल्डकॉनकडून मिळालेल्या कोटय़वधींच्या रकमेतून भुजबळ फार्म परिसरात अलिशान महालाची उभारणी झाली. बिल्डकॉनच्या संचालकांनी भुजबळ कुटुंबियांना ‘फिफा’ फुटबॉल स्पर्धा बघण्यासाठी खास विमानातून परदेशवारीही घडवून आणली, अशा आरोपांच्या फैरी शुक्रवारी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी झाडल्या. परंतु, हे आरोप तथ्यहीन असल्याचे नमूद करत अशोका बिल्डकॉनने भुजबळ कुटुंबियांना बंगल्यासाठी कोणतीही आर्थिक मदत केली नसल्याचे म्हटले आहे.
सोमय्या यांनी भुजबळ फार्म येथे जाऊन उपरोक्त परिसर दूरूनच न्याहाळला. सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा सांभाळत असताना भुजबळांनी अशोका बिल्डकॉन कंपनीला नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासह राज्यातील अनेक रस्त्यांची कामे मिळवून दिली होती. त्या मोबदल्यात या ठेकेदाराने भुजबळ फाऊंडेशनला कोटय़वधी रुपये दिले. त्यातील ४० कोटींच्या बँक खात्यातील दस्तावेज मिळाले असून भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांवर भुजबळ महालाचे बांधकाम झाल्याकडे सोमय्या यांनी लक्ष वेधले. अशोका बिल्डकॉनचे अशोक कटारिया आणि आशिष कटारिया यांनी भुजबळ कुटुंबियांना ‘फिफा’चे फुटबॉल सामने दाखविण्यासाठी खास विमानाने परदेशात नेले असा आरोप केला .
अशोका बिल्डकॉनने मात्र सोमय्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.