नाशिक – शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेने सुरू केलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील अनेक महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुरगाणा, पेठ, दिंडोरी आदी भागात आंदोलक रस्त्यावर उतरल्याने महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणाऱ्या दिंडोरी-सापुतारा या मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली. तर नाशिक-पेठ-धरमपूर (गुजरात) मार्गावर अडकलेल्या शेकडो वाहनांना पोलिसांनी हस्तक्षेप मार्ग मोकळा करून दिला. या मार्गावरील वाहतूक संथ आहे. आंदोलनामुळे हरसूल व सुरगाणा भागातही वाहतूक वळवण्यात आल्याचे ग्रामीण पोलिसांनी म्हटले आहे.
अखिल भारतीय किसान सभा आणि माकपच्यावतीने तालुकानिहाय आंदोलन सुरू केलेल्या आंदोलनाचा प्रभाव आदिवासी तालुक्यात अधिक्याने दिसत आहे. सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर हे तीन तालुके टंचाईगस्त आहेत. या भागातील पश्चिमी वाहिनी नद्या व उपनद्यांवर मोठ्या आकाराचे बंधारे बांधून त्यांचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीला द्यावे, वनपट्टेधारकांचे क्षेत्र ४० आरपेक्षा कमी असल्याने शासकीय योजनांचे लाभ घेता येत नाहीत. त्यामुळे कब्जे वहिवाटीतील चार हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राची मोजणी करून भूखंड मंजूर करावा व त्याचा सातबारा तयार करावा, अपात्र वनदाव्यांची फेरचौकशी करून दावे पात्र करणे, वनपट्टेधारकांच्या कृषिमालाची हमी भावाने खरेदी करणे आदी मागण्यांकडे आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले. किसान सभेचा आदिवासी तालुक्यात प्रभाव आहे. या भागात शेकडो आदिवासी बांधव आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अनेक मार्गावरील वाहतुकीला फटका बसला.
महाराष्ट्र व गुजरातला जोडणारे नाशिक-पेठ आणि नाशिक-वणीमार्गेे सापुतारा या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतुकीवर आंदोलनाचा परिणाम झाला. नाशिक-पेठ रस्तावरील बेमुदत रास्ता रोको आंदोलनामुळे रविवारी दोन्ही बाजुला शेकडो वाहने अडकून पडली होती. प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रात्रीही मोर्चेकरी ठाण मांडून बसल्याचे सांगितले जाते. नाशिक-वणी-मार्गे सापुतारा या मार्गावर बोरगाव येथे किसान सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात उतरले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पोलिसांनी ती चिरई गावातून वळवल्याचे सांगण्यात आले. सुरगाणा, हरसूल भागातील रस्त्यांवर आंदोलन सुरू आहे. किसान सभेच्या आंदोलनामुळे पेठ ,निफाड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वरमधील अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाल्याचे सुनील मालुसरे यांनी सांगितले. दरम्यान, आंदोलनामुळे काही मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविली गेली असून ती संथपणे सुरू आहे. सोमवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी किसान सभेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. परंतु, कुठलाही तोडगा निघाला नसल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.
किसान सभेच्या आंदोलनामुळे नाशिक-वणी-सापुतारा मार्गे गुजरात आणि नाशिक-पेठ-धरमपूर या मार्गासह अन्य भागातही कुठेही वाहतूक विस्कळीत झालेली नाही. आंदोलक रस्त्यात बसल्याने वणी-सापुतारा, सुरगाणा, हरसूलमधील मार्गावरील वाहतूक वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. नाशिक-पेठ रस्त्यावर आंदोलनामुळे रविवारी दोन, तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. परंतु, पोलिसांनी हा रस्ता मोकळा केला आहे. – बाळासाहेब पाटील (पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण)
