जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीदरम्यान पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांचे पुत्र सुमित पाटील यांनी पाचोरा तालुका प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्था मतदारसंघातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केला आहे. दुसरीकडे, या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सतीश परशुराम शिंदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.
सुमित पाटील यांनी पाचोरा तालुक्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांच्या उमेदवारीवर सतीश परशुराम शिंदे यांनी आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवली होती. यामुळे सुमित पाटील यांच्या उमेदवारीच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यांच्या अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. अखेर हरकतींवरील सुनावणी आणि छाननीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करण्याचा निर्णय घेतला.
आमदार पाटील यांच्या रणनीतीला धक्का
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांना संधी मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. मात्र, अर्जच बाद झाल्याने त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नांना खीळ बसल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्जावर घेण्यात आलेली हरकत आणि त्यानंतर झालेला निर्णय यामुळे पाचोरा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेगळी दिशा मिळाली आहे. पुत्राचा उमेदवारी अर्ज बाद होणे हा आमदार पाटील यांच्यासाठी केवळ निवडणुकीच्या दृष्टीने नव्हे, तर राजकीय प्रतिष्ठेच्या दृष्टीनेही मोठा धक्का मानला जात आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपले राजकीय अस्तित्व आणि प्रभाव कायम ठेवण्याच्या दृष्टीने ही जागा महत्त्वाची मानली जात होती. मात्र, अर्ज नामंजूर झाल्याने या मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत.
शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित
सुमित पाटील यांचा अर्ज नामंजूर झाल्यानंतर पाचोरा तालुक्यातील संबंधित मतदारसंघातून सतीश परशुराम शिंदे यांचाच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. भाजपशी संबंधित असलेल्या शिंदे यांच्या बिनविरोध निवडीमुळे जिल्हा बँकेतील भाजपचे प्रतिनिधित्व वाढण्याची चिन्ह आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या बरोबरीने भाजपच्या दोन जागा बिनविरोध झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील या निवडणुकीत भाजपची स्थिती अधिक मजबूत होत असल्याचे दिसत आहे.
आमदार पाटील काय भूमिका घेतात?
सुमित पाटील यांचा अर्ज बाद होणे आणि सतीश शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित होणे, या घडामोडीमुळे पाचोरा तालुक्यातील सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. आमदार किशोर पाटील यांच्यासाठी हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पुढील घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे आमदार किशोर पाटील यांना पुत्राच्या उमेदवारीच्या रूपाने मोठा धक्का बसला असताना दुसरीकडे भाजपचे सतीश शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याने पाचोरा तालुक्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. आता आमदार पाटील काय भूमिका घेतात, त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
