नाशिक : नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची (एनडीएसटी) निवडणूक जाहीर झाल्याने उमेदवार चाचपणी आणि पॅनल निर्मितीसाठी विविध शिक्षक संघटनांनी व्यूहरचना आखण्यास प्रारंभ केला आहे. ‘एनडीएसटी’ ही जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर पगारदार कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी पतसंस्था असल्याने या प्रतिष्ठित पतसंस्थेवर निवडून जाण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
सध्या शाळांना उन्हाळी सुटी असल्याने मतदारांशी संपर्क करण्यासाठी विविध लग्न सोहळय़ांचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे एखाद्या शिक्षक, अधिकाऱ्याशी संबंधित लग्न सोहळय़ात मोठय़ा प्रमाणावर इच्छुक दिसू लागले आहेत. उन्हाळी सुटीमुळे मतदारांशी थेट संपर्क कठीण झाले आहे. त्यामुळे समाजमाध्यमाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार, पॅनल चाचपणी करू लागले आहेत. आपणच कसे चांगले, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. काही इच्छुक उमेदवार आणि पॅनल प्रमुख यांनी शिक्षकांच्या मुलामुलींचे लग्न कार्य तसेच संस्थाचालक यांना लक्ष्य करत प्रचारास सुरुवात केली आहे. विद्यमान संचालक मंडळाकडून पतसंस्थेत कसा पारदर्शी कारभार केला, हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एनडीएसटीच्या निवडणुकीत वेगवेगळय़ा शिक्षक संघटना, शिक्षक नेते, इच्छुक उमेदवार शिक्षक मतदारापेक्षा विशिष्ट संस्थाचालकाच्या भेटी घेऊन पाठिंबा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत.
त्यामुळे मतदार संस्थाचालक आहेत की शिक्षक, असा प्रश्न निर्माण होत आहे. संस्था चालकांकडे पायघडय़ा टाकणाऱ्या उमेदवारांना मतदार स्वीकारतात की, शिक्षक मतदारांकडे मते मागणाऱ्या संघटना, उमेदवारांना मतदार स्वीकारतात, हे निवडणुकीत दिसून येईल. या निवडणुकीत चार पॅनल होण्याची शक्यता आहे. सत्तारूढ संचालकांचा एक पॅनल, मोठे संस्थाचालक यांचे दुसरे पॅनल तर एनडीएसटी विकास समितीचे तिसरे पॅनल आणि २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांचे चौथे पॅनल होण्याची शक्यता आहे. पॅनल निर्मिती करताना मोठे संस्थाचालक गळाला लागल्यास आयते मनुष्यबळ उपलब्ध होऊन एक गठ्ठा मते मिळण्यास मदत होऊ शकते. शिवाय मोठय़ा संस्थाचालकांनी आदेश दिल्यानंतर कर्मचारी मुकाट आपल्या पॅनलचे काम करतील, अशी भावना असल्याने संस्था चालकांना पॅनलमध्ये घेण्यासाठी धडपड केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Knee bashing aspirants wedding ceremony propaganda center ndst election amy
First published on: 18-05-2022 at 00:06 IST