नाशिक – ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून एप्रिल महिन्यात वादळ उठले होते. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी धमकावले होते. गायकवाड यांनी आंबी यांच्या विरोधात वापरलेल्या अनुचित भाषेचा अनेकांनी निषेध केला होता. या प्रकरणात संजय गायकवाड यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी आंबी यांनी केलेली असताना कोल्हापूर सत्र न्यायालयाने संजय गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला परवानगी दिली. दुसरीकडे, प्रशांत आंबी यांनी आपणास अजूनही आमदार गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

काँम्रेड गोविंद पानसरे हे शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकावरून याआधीही वाद झालेला आहे. एप्रिल महिन्यात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमात आली होती. त्यानंतर प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

आमदार गायकवाड यांनी पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्यात आल्याचा आणि महाराजांचा खोटा इतिहास दाखविण्यात आल्याचा आरोप केला होता. पुस्तकात अनेक वेळा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचेही त्यांनी म्हटले होते. आंबी यांनी संजय गायकवाड यांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी कोल्हापूर सत्र न्यायालयात धाव घेतली होती. गायकवाड यांच्या चौकशीची परवानगी न्यायालयाने दिली.

दरम्यान, प्रशांत आंबी रविवारी नाशिक येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांकडून आजही धमक्यांचे फोन येत असल्याचे सांगितले. आमदार संजय गायकवाड यांनी ऑडिओ क्लिपमधील आवाज आपलाच होता, असे म्हटले होते. धमकीचा फोन त्यांचाच होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.अजूनही त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन मला येत आहेत. आई-बहिणीवरून शिव्या देत आहेत.

आम्ही त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही. परंतु,आता पोलीस या प्रकरणात गंभीर होणार आहेत का, असा माझा सवाल आहे. याआधी आम्ही तक्रार दिली नव्हती. काही तरुण हे स्पर्धा परीक्षा देणारे होते. मात्र आता त्यांचे धाडस वाढत आहे. मला चार दिवसापूर्वी देखील धमकीचा फोन आला. सोमवारी लेखी अर्ज कोल्हापूर पोलिसांना देणार आहे. काॅम्रेड गोविंद पानसरेंना न्याय मिळाला की नाही हा संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. परंतु, आमचा पोलिसांवर अजिबात विश्वास नाही, पोलीस जे पुरावे कोर्टासमोर आणतील त्यावरच कोर्ट निर्णय देईल, असे प्रशांत आंबी यांनी नमूद केले.

आम्ही भोळे नाहीत. चळवळीतील कार्यकर्ते आहोत. गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री यांचाच या प्रकरणावर दबाव आहे. त्यांचा दबाव नसता तर आतापर्यंत संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता. त्यांच्यावर कारवाई झाली असती. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार नाही. परंतु, रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असेही प्रशांत आंबी यांनी सांगितले.