नाशिक – महापालिकेच्या ३१ प्रभागात १२२ जागांसाठी गुरुवारी सकाळपासून मतदानाला उत्स्फुर्तपणे सुरूवात झाली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीला कमालीचे महत्व प्राप्त झाले आहे. अलीकडेच त्र्यंबक नगरपालिकेचे नगराध्यक्षपद गमवावे लागल्याने भाजपने नाशिक महापालिकेची निवडणूक अधिक गांभिर्याने घेतली. एबी अर्ज वाटपातील गोंधळ, उफाळलेला पक्षांतर्गत असंतोष, अनेक प्रभागात बंडखोरी यामुळे भाजपचे संकटमोचक तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे पंधरवड्यापासून एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता त्यांना जळगावऐवजी नाशिकमध्ये तळ ठोकावा लागला. मतदानाच्या दिवशी ते नाशिकमध्ये परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

सिंहस्थ कुंभमेळा हा हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. नाशिक- त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे नाशिक महापालिकेवर आपले वर्चस्व राखण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अखेरच्या क्षणी बदललेल्या निर्णयाचा फटका भाजपला बसला होता. नगराध्यक्षपद गमवावे लागले. शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली. त्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने सावधपणे पावले टाकली होती. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी गोंधळ उडाला. एबी अर्जांची पळवापळवी झाली. पक्षात इच्छुकांची संख्या मोठी होती. ऐनवेळी इतर पक्षांतील मातब्बरांना प्रवेश दिल्याने मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. अनेक प्रभागात इच्छुकांनी शिवसेना शिंदे गट वा अन्यत्र पक्षांतर करीत उमेदवारी मिळवली. एबी अर्ज वाटपावेळी झालेल्या गोंधळात सिडकोत तीन जागांवर वेगळाच तिढा झाला. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराऐवजी इतरांना पक्षाचे चिन्ह मिळाले. यामुळे तीन जागांवर पुरस्कृत उमेदवारांच्या चिन्हाचा प्रचार करण्याची वेळ भाजपवर आली.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, मालेगाव महापालिका निवडणुकींसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया सुरू झाली. या सर्व निवडणुकीची जबाबदारी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्याकडे आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक ११८ जागा लढवत आहे. यातील तीन उमेदवार पुरस्कृत असून त्यांना वेगवेगळी चिन्हं मिळाली आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपुष्टात येण्याच्या आदल्या दिवशीपासून म्हणजे २९ डिसेंबरपासून कुंभमेळामंत्री महाजन हे नाशिकमध्ये असल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगितले जाते. या काळात एक, एक दिवस ते मालेगाव व जळगावमध्ये जाऊन लगेचच नाशिकला परतले. प्रभागनिहाय परिस्थितीची माहिती घेतली. काही प्रभागात ‘क्रॉस व्होटिंग’ची शक्यता लक्षात घेऊन व्यूहरचना आखल्याचे सांगितले जाते. मतदानाच्या दिवशी ते नाशिकमध्ये तळ ठोकून होते. वेगवेगळ्या भागातील मतदानाची माहिती त्यांच्याकडून घेतली जात असल्याचे सांगितले जाते.

गतवेळी नाशिक महापालिकेत भाजपचे ६६ नगरसेवक होते. यावेळी १०० प्लसचा नारा देणाऱ्या भाजपची निवडणूक प्रक्रियेतील घटनांनी पंचाईत झाली. त्र्यंबक नगरपालिकेसारखी नाशिक महापालिकेत स्थिती ओढावू नये म्हणून खुद्द मंत्री महाजन यांना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.