नाशिक : प्रयागराज कुंभमेळ्यानंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सुक्ष्म नियोजनावर भर देण्यात येत आहे. ऐनवेळी आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास त्याठिकाणी तत्काळ मदत पोहचावी, यासाठी नाशिक पोलीस दलाच्या वतीने प्रयागराजच्या धर्तीवर वॉर रुम तयार करण्यात येणार आहे.

प्रयागराज येथे २०२५ मध्ये भरलेला कुंभमेळा जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला. अमृत पर्वात स्नानासाठी गर्दीचा उच्चांक मोडला गेला. चेंगराचेंगरी, भाविकांची गैरसोय, किरकोळ अपघात, अशा घटनाही घडल्या. गंगेचे विस्तीर्ण पात्र असतानाही कुंभमेळ्यातील नियोजनातील कमतरता, आस्थापनांमधील असमन्वय हे विषयही चर्चेत राहिले. या अडचणी २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभपर्वात येऊ नयेत, यासाठी सुक्ष्म नियोजनावर भर देतांना एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

प्रशासकीय पातळीवर एकिकडे बैठकांचे सत्र सुरू असतांना वेगवेगळे विभाग आपले नियोजन करीत आहेत. नाशिक पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता जादा पोलीस बंदोबस्तासह आपत्ती व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, चेंगराचेंगरी उद्भवल्यास काय उपाययोजना करावी, याविषयी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रयागराजसह राज्यातील पंढरपूरसह अन्य ठिकाणी होणाऱ्या यात्रा, उत्सव यांच्यातील गर्दीचे नियोजन अभ्यासण्यासाठी दौरे होत आहेत.

दुसरीकडे. नियोजनाच्या अंमलबजावणीत तसेच प्रत्यक्ष परिस्थिती, अचानक उद्भवणारी परिस्थिती पाहता स्वतंत्र वॉर रुम तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी आरोग्य, पोलीस, जिल्हा प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे, बांधकाम यासह वेगवेगळ्या आस्थापनातील अधिकारी त्या वॉर रुममध्ये असतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून गोदाघाट, शाहीस्नान ठिकाण यासह अन्य ठिकाणी लक्ष ठेवले जाणार आहे. कुठे काही गडबड होत असल्याचे लक्षात आले किंवा आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने त्या ठिकाणी असलेल्या त्या त्या विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संपर्क करुन मदत पोहचविण्यात येईल. यामध्ये वेळ वाचेल तसेच परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात येण्यास मदत होऊ शकेल.