​नाशिक – सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान अमृत पर्वणीच्या दिवशी नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या खासगी वाहनांना शहरात प्रवेश बंद अर्थात ‘नो एंट्री’ असणार आहे. शहराच्या बाहेरील नियोजित वाहनतळांवर संबंधितांची खासगी वाहने थांबवली जातील. तेथून भाविकांना विशेष बससेवेद्वारे घाट परिसरात अमृत स्नानासाठी नेण्याचे नियोजन आहे.

​२०१५ च्या कुंभमेळ्यात खासगी वाहने शहराच्या सीमेवरील वाहनतळांवर थांबवली गेली होती. त्यामुळे लाखो भाविकांना अमृत स्नानासाठी मोठी पायपीट करावी झाली होती. मागील कुंभमेळ्यातील अनुभव, वाहतूक व्यवस्थेतील अडचणी आदींचा अभ्यास करून २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी प्रमुख मार्गांलगत नवीन वाहनतळांची निवड करण्यात आल्याचा दावा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने केला आहे.

​भाविकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी प्राधिकरणाने त्रिस्तरीय वाहनतळ व्यवस्थेचे नियोजन केले आहे. त्याअंतर्गत नाशिकमध्ये सुमारे ८८८ हेक्टर क्षेत्रावर ४६ वाहनतळ, तर त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे ६७१ हेक्टर क्षेत्रावर २६ वाहनतळ नियोजित आहेत. या संपूर्ण व्यवस्थेची एकत्रित क्षमता सुमारे तीन लाख मोटारी इतकी प्रस्तावित आहे. ही प्राथमिक आकडेवारी असून आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल केला जाईल. वाहनतळात दुचाकी, चारचाकी तसेच बससाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असून भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. ही वाहनतळ व्यवस्था कुंभमेळ्याच्या वाहतूक आराखड्याशी जोडण्यात आली असून गर्दीच्या दिवशी सुमारे तीन हजार एसटी बसच्या माध्यमातून बाह्य वाहनतळ ते घाट परिसर अशी शटल सेवा चालविण्याचे नियोजन आहे.

​त्रिस्तरीय वाहनतळ कसे?

​शहरात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर पहिल्या टप्प्यात बाह्य (आऊटर) वाहनतळांवर वाहनांचे नियोजन केले जाईल. त्यानंतर दुसऱ्या स्तरावरील (आऊटर १ वाहनतळ) पार्किंग, वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ‘बफर’ म्हणून कार्य करेल. तर तिसऱ्या स्तरावरील अंतर्गत वाहनतळ (इनर पार्किंग) परिसरापर्यंत केवळ एसटी महामंडळाच्या विशेष बससेवेद्वारे भाविकांना आणले जाणार आहे. तेथून पुढील घाट परिसर हा पायी प्रवासासाठी नियोजित केला जाणार आहे. ​अमृत स्नानाच्या गर्दीच्या दिवशी मुख्य शहर परिसरात खासगी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी वाहन उभे केल्यानंतर पुढील प्रवास सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा, यासाठी वाहनतळ व्यवस्था महत्त्वाची ठरणार असल्याचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी म्हटले आहे.

​शहर वाहनमुक्त राहणार

​कुंभमेळ्यातील अमृत पर्वणीच्या दिवशी येणाऱ्या भाविकांची खासगी वाहने नाशिक व त्र्यंबकेश्वरबाहेर थांबवली जातील. या वाहनांसाठी नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर वाहनतळांचे नियोजन करण्यात आले आहे. अमृत स्नानाच्या दिवशी मुख्य शहर परिसर वाहनमुक्त ठेवण्याचे नियोजन आहे. वाहनतळावर उतरणाऱ्या भाविकांना तीन हजार बसमधून अमृत स्नानासाठी त्या, त्या भागातील निकटच्या घाटाकडे नेले जाईल.