नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या ध्वजस्तंभाचा शिलान्यास सोहळा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. कुशावर्त तीर्थ येथे सोहळा सुरु असतांना प्रशासन आणि आखाड्यांमधील विसंवाद ठळकपणे उघड झाला. महाजन कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या कामांची माहिती देत असतांना महंतांनी नाराजी व्यक्त करुन कामे कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला.
सोमवारी कुशावर्त तीर्थावर ध्वजस्तंभाचा शिलान्यास सोहळा वैदिक मंत्रोच्चारात व भक्तिमय वातावरणात उत्साहात झाला. या सोहळ्यास अखिल भारतीय आखाडा परिषदेचे साधु ,महंत उपस्थित होते. आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी कुंभमेळ्याच्या कामांविषयी माध्यमांकडे नाराजी व्यक्त केली. कुंभमेळ्याच्या कामांची यादी मंत्र्यांकडून वाचली जाते. प्रत्यक्षात ही कामे कुठेच दिसत नाहीत. कुंभमेळा सुरू होण्यास अवघा काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असतांना ही कामे कधी हाेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दर्शन पथाचे अद्याप भूमिपूजनही झालेले नाही. घोटी-त्र्यंबक बाह्य रस्ता झालेला नाही. प्रारंभी काही निधी देण्यात आला. त्यात मूलभूत सुविधा, ध्वजाचे काम झाले. प्रत्येक आखाड्यात बारा खोल्या बांधल्या जाणार होत्या. अद्याप ते काम सुरू झालेले नाही. कुंभमेळा प्राधिकरण आमचे ऐकत नाही. मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाही. मंत्री केवळ गोड गोड बोलतात. त्यांच्या भुलथापांना आम्ही बळी पडतो. कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी घेतला पाहिजे, नाशिक-त्र्यंबक येथे येऊन त्यांनी आखाड्यांशी चर्चा करावी अशी मागणी महंत शंकरानंद सरस्वती यांनी केली.
साधू, महंत नाराज नसल्याचा दावा
मंत्री महाजन यांनी यासंदर्भात भूमिका मांडली. कुंभमेळ्यात दहा कोटीहुन अधिक भाविक या ठिकाणी येतील. या अनुषंगाने कुशावर्तसारखे दोन मोठे कुंड करण्यात येत आहेत. साधु, महंत या ठिकाणी स्नान करणार आहेत. हरित स्वच्छ कुंभमेळ्यासाठी काम करत आहोत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्यासाठी काही कमी पडू देऊ नका असे स्पष्ट सांगितले आहे. साधु, महंतांची कोणतीही नाराजी नाही. हरित कुंभ- सुरक्षित कुंभसाठी वेगाने कामे सुरू असून कुंभमेळ्याआधी सर्व कामे पुर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कामामुळे भाविकांना, स्थानिकांना काही त्रास होईल पण रस्ते, पुल, घाट यासह सर्व कामे वेळेत पुर्ण होतील.
