नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून गदारोळ उडालेला असताना, शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतील जलपर्णी काढण्यासाठी आणि नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्रपणे ८० स्वच्छता कर्मचारी तैनात करण्याची तयारी केली आहे. यासोबतच नवीन स्क्रिमर यंत्रासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे.

ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभपर्वाला सुरुवात झाली असताना गोदावरी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे. शहरातून गोदावरी नदी साधारणतः २१ किलोमीटर अंतरापर्यंत वाहते. सांडपाणी नदीपात्रात मिसळणे, पात्रातील जलपर्णी आणि कचरा यामुळे गोदावरीचे पाणी दूषित झाल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अलीकडेच महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. कुंभमेळ्यातील अमृतस्नानाला सुमारे नऊ महिने बाकी आहेत. तत्पूर्वी गोदावरी प्रदूषणमुक्तीशी संबंधित कामे पूर्णत्वास नेण्याची तयारी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत गोदावरी व उपनद्यांच्या पात्रातील जलपर्णी काढणे आणि नदीपात्राची स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्रपणे ८० स्वच्छता कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर असून, लवकरच हे काम सुरू होईल, असे मनपाच्या पर्यावरण व गोदावरी संवर्धन कक्षाच्या प्रमुख तथा उपायुक्त डॉ. संगिता नांदूरकर यांनी सांगितले.

सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने दीड हजार कोटी रुपयांची सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारणे आणि अस्तित्वातील केंद्रांचे सक्षमीकरण करण्याची कामे हाती घेतली आहेत. नदीपात्रालगतच्या सांडपाणी वाहिन्यांचे स्थलांतर केले जात आहे.

तीन वर्षासाठी नियुक्ती

नदी पात्रात निर्माल्य आणि प्रसाद साहित्य टाकले जाते. धार्मिक विधींसाठी देशभरातून येणाऱ्या भाविक व पर्यटकांसमोर महापालिकेची प्रतिमा मलीन होत आहे. कुंभमेळ्यात देशभरातून साधू-महंत आणि भाविक स्नानासाठी गोदावरीच्या काठावर दाखल होतील. या पार्श्वभूमीवर तीन वर्षांच्या कालावधीसाठी ८० स्वच्छता कर्मचारी नियुक्त केले जात आहेत. नदीकाठालगतच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र पथक कार्यरत आहे. नदीपात्रातील स्वच्छतेची जबाबदारी नव्या कर्मचाऱ्यांवर सोपवली जाईल. यामध्ये सर्वाधिक कर्मचारी गोदावरी नदीसाठी कार्यरत असतील.

नवीन स्क्रिमर यंत्रही घेणार

नदीपात्र स्वच्छ ठेवणे, पात्रातील पाणवेली काढणे, प्लास्टिक आणि कचऱ्याची सफाई करणे ही कामे स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून केली जातील. यासोबतच जलपर्णी काढण्यासाठी मनपाचा पर्यावरण व गोदावरी संवर्धन कक्ष स्क्रिमर यंत्र खरेदी करणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया राबवली जात असल्याचे उपायुक्त डॉ. संगिता नांदूरकर यांनी सांगितले.