नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यास कमी कालावधी राहिलेला असतानाही आखाड्यांमध्ये आवश्यक त्या कामांची सुरूवात झाली नसल्याने त्र्यंबकेश्वरमधील साधू-महंतांनी संताप व्यक्त करीत शासनाचा निषेध केला. केंद्रात व राज्यात हिंदुत्ववादी सरकार असूनही हिंदू धर्मियांच्या सर्वात मोठ्या सोहळ्यात अनास्था दाखवली जात असेल तर वेळेवर सर्व आखाडे आपला निर्णय घेतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी राज्य व केंद्र सरकारने सुमारे ३० हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. पायाभूत सुविधांच्या कामांना सुरुवात झाली असून आखाड्यांशी निगडीत सोयी सुविधांच्या कामांवरून वादाला तोंड फुटले आहे. नाशिक शहरात वैष्णवपंथीय तीन आखाड्यांकडे जागा नसल्याने साधुग्रामची उभारणी केली जाते. तर त्र्यंबकेश्वरमध्ये शैवपंथीय १० आखाड्यांकडे स्वत:ची जागा असून तिथे सुविधा उपलब्ध केल्या जातात.

या संदर्भात शनिवारी त्र्यंबकेश्वर येथील श्री पंचायती निरंजनी आखाड्यात शैवपंथीय आखाडे, मठाधिपती, आश्रम प्रमुखांची बैठक पार पडली. कामे सुरू न होण्याचे खापर त्यांनी कुंभमेळा प्राधिकरणावर फोडले. प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले. हजारो कोटींचे आराखडे सांगितले जातात, परंतु, एकही काम सुरू नसल्याचे सांगितले.

प्रत्येक आखाड्याला पाच कोटींचा निधी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. परंतु, कुंभमेळा आयुक्त टाळाटाळ करतात. प्राधिकरण केवळ आश्वासनांची खिरापत वाटत आहे. आखाड्यांच्या कामांचा एक कोटींचा निधी नगर पालिकेकडे वर्ग केल्यामुळे जीएसटी व टक्केवारी वगळून काय कामे होतील, असा प्रश्न आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी केला. कुंभमेळ्याची सर्व कामे, त्यावरील खर्च आदी माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली.

बडा उदासीन आखाड्याचे महंत दानमुनी यांनी मागील कुंभात कुशावर्तपासून गंगेला स्लॅब टाकून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. आता तेच फोडून पुन्हा दुप्पट खर्च करण्याचे नियोजन होत असून यामध्ये वेळ व पैसा जाऊन नुकसान होणार असल्याकडे लक्ष वेधले. विविध कामांसाठी शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या आखाड्यांच्या जागांवर काहींनी आक्षेप घेतला. १० आखाड्यांसह ५० मठ, आश्रमांसाठी मागील कुंभमेळ्याप्रमाणे निधी व व्यवस्था उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली.

त्र्यंबकेश्वरमधील साधू-महंतांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली जाईल. मध्यंतरी निवडणूक आचारसंहिता होती. आखाड्यांसाठी प्रत्येकी एक कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश दिले गेले आहे. पुढील आठवड्यात ही महत्वाची कामे सुरू होतील. पावसाळ्याआधी ती केली जातील. पुढील कामांचे नियोजन प्रगतीपथावर आहे. फेब्रुवारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली खाली होणाऱ्या बैठकीत आखाड्यांच्या निधीच्या मागणीबाबत निर्णय होईल. – शेखर सिंह (कुंभमेळा आयुक्त)