जळगाव : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. येत्या १० तारखेला यासंदर्भातील मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. कुंभमेळ्याची बहुतांश कामे अंदाजित किमतीपेक्षा २० ते ४५ टक्के कमी दराने अर्थात ‘बिलो’मध्ये सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.

रोहित पवार यांनी कुंभमेळ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर महाजन म्हणाले की, आम्हीही वाट पाहत आहोत. त्यांनी नाशिकला यावे आणि तेथील कामे प्रत्यक्ष पाहावीत. केवळ बाहेरून आरोप करून परिस्थिती समजणार नाही. कुंभमेळ्याची सर्व कामे मोठ्या प्रमाणात बिलोमध्ये सुरू असल्याचा दावा करताना महाजन यांनी काही कामांचे उदाहरणही दिले. घोटी ते त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम ३६ टक्के बिलोमध्ये सुरू असून, सुमारे ११०० कोटी रुपयांचे आणखी एक काम ४२ टक्के कमी दराने म्हणजे बिलोमध्ये सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘भ्रष्टाचार झाला असेल तर दाखवा’

कुंभमेळ्याच्या कामांच्या निविदा अपेक्षित किमतीपेक्षा एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी दराने गेल्याने आम्हालाही धक्का बसला असे महाजन यांनी नमूद केले. मात्र, बिलोमध्ये निविदा गेल्यानंतरही संबंधित कामे प्रत्यक्षात सुरू असून कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवले जात असल्याचे ते म्हणाले. कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत.

विरोधकांकडून कुंभमेळ्याच्या कामांवर घोटाळ्याचे आरोप केले जात असले तरी प्रत्यक्षात कामे बिलोमध्ये होत आहेत, असे महाजन यांनी सांगितले. आरोप करणाऱ्यांना नाशिकला येऊन कामांची पाहणी करण्याचे आव्हानही त्यांनी दिले. ‘नाशिकला या, तुम्हाला पाहिजे ते टेंडर आम्ही दाखवतो. ४५ टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे ६० टक्के बिलो पाहिजे का, तेही सांगा. मात्र, कुंभमेळ्याच्या कामांमध्ये एक टक्का तरी भ्रष्टाचार झाला आहे का, हे दाखवून द्यावे,’ अशा शब्दांत महाजन यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

‘टेंडर काढण्याचा अधिकार मलाही नाही’

कुंभमेळ्याच्या कामांच्या निविदा प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण देताना महाजन यांनी टेंडर काढण्याचा अधिकार कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्याला नसल्याचे सांगितले. पुढारी, आमदार, खासदार किंवा स्वतः आपल्यालाही टेंडर काढण्याचा अधिकार नसतो, असे त्यांनी स्पष्ट केले. निविदा प्रक्रिया संबंधित यंत्रणेमार्फत राबविली जाते. त्यामुळे या प्रक्रियेवर राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करणे योग्य नसल्याचे महाजन यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता होऊ नये यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आधीच कडक सूचना देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. कामे मोठ्या प्रमाणात बिलोमध्ये गेली असली तरी त्यांचा दर्जा आणि गुणवत्ता कायम राहिली पाहिजे, यावर शासनाचे लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.