नाशिक – कुरुंगवाडीसारख्या दुर्गम आदिवासी गावात एकूण ७५० मतदार आहेत. दुर्दैवाने यातील १५० मतदारांच्या मतदानावर प्रशासनाने गदा आणली आहे. हे नागरिक याच गावचे मूळ रहिवासी असताना, त्यांचा जन्म याच मातीत झालेला असताना ‘एसआयआर’च्या माध्यमातून त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. गावातील २० टक्के मतदान परस्पर कमी करणे, हा एसआयआरचा खरा आणि घातक चेहरा आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम कुरुंगवाडी येथे काँग्रेसच्या वतीने ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी सपकाळ यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरिवेला प्रसाद आणि सहप्रभारी बी. एम. संदीप यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेत सरपंच गोपाळ सावंत, पिंटू सावंत, शंकर सावंत यांनी ग्रामस्थांच्या भावना मांडल्या. सपकाळयांनी ‘वोट चोर, गद्दी छोड’ आणि ‘संविधान बचाव’ अभियानाच्या माध्यमातून कुरुंगवाडी येथे ग्रामसभा घेण्यात आल्याचे सांगितले. अभियानात पूर्ण ताकदीने सहभागी होण्याचा एकमुखी ठराव ग्रामस्थांनी केला असून संपूर्ण गाव काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असल्याचा दावाही त्यांनी केला.
सपकाळ म्हणाले की, देशातील नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्यांना पुन्हा एकदा गुलाम बनवण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे. देशाची संपत्ती आणि जमिनी उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन तिथे बेगडा विकास उभा केला जात आहे. मात्र, या विकासात स्थानिकांना केवळ चौकीदारी करण्याचेच काम उरणार आहे का, असा सवाल त्यांनी केला. आपल्या अधिकारांवर गदा आणली जात असून, नागरिकांचे अधिकार काढून घेऊन त्यांना पुन्हा गुलाम बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पूर्वी इंग्रजांची गुलामी होती. आता दिल्लीत बसलेले देशात आर्थिक आणि राजकीय गुलामी लादत आहेत.
भारतीय संविधान, देशाची संस्कृती आणि काँग्रेस ज्यांना ‘आदिवासी’ मानते, त्यांना भाजप आणि संघ ‘वनवासी’ म्हणून हिणवत आहे. आदिवासींची मूलनिवासी ओळख पुसून टाकण्याचा आणि त्यांची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या अधिकारांचे, संविधानाचे, मतांच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे, असे आवाहन सपकाळ यांनी केले. प्रदेश पदाधिकारी राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर उपस्थित होते. आदिवासी महिलांनी पारंपरिक पद्धतीने सपकाळ यांचे औक्षण केले. आदिवासी बांधवांनी नृत्य सादर करुन सर्व नेत्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले.
