​मालेगाव: महाराष्ट्राला २०२७ पर्यंत पूर्णपणे कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) हे महत्त्वाकांक्षी अभियान राबवले जात असतानाच, मालेगाव तालुक्यातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तालुक्याच्या वळवाडी गावातील एका कुष्ठरोग बाधित वृद्ध महिलेला उपचारांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रकारावर भाजपचे स्थानिक नेते बंडूकाका बच्छाव यांनी तीव्र संताप व्यक्त करत, दोषी आरोग्य अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच याप्रकरणी थेट जिल्हा परिषदेत ‘बिऱ्हाड आंदोलन’ करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आदिवासी समाजातील ही वृध्दा गेल्या ५ वर्षांपासून कुष्ठरोगाशी लढा देत आहे. दारिद्र्य, उपेक्षा आणि सामाजिक बहिष्कार सहन करत ही वृध्दा गावाबाहेर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहे. दोन वर्षांपूर्वी ही व्यथा ‘बारा बलुतेदार फाउंडेशन’चे संस्थापक व भाजप नेते बंडूकाका बच्छाव यांच्या निदर्शनास आली. तेव्हापासून त्यांनी या वृध्देस किराणा, कपडे आणि औषधोपचार पुरवून आधार उपलब्ध करून दिला आहे. तसेच त्यांना कायमस्वरूपी निवारा मिळावा म्हणून शासनाकडून मंजूर झालेले घरकुल बांधून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी गावालगतची जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. परंतु, स्थानिकांच्या विरोधामुळे जागा उपलब्ध होऊ शकली नाही. त्याचे पर्यवसान घरकुलाचा प्रश्न रखडण्यात झाले आहे.

आरोग्य यंत्रणेची अनास्था

​काही दिवसांपूर्वी संबंधित वृद्धेच्या पायाला कुष्ठरोगामुळे गंभीर जखम झाली. वेळेवर उपचार न मिळाल्याने संसर्ग वाढून ही जखम आणखीन चिघळली व गुंतागुंत निर्माण झाली. तेव्हा बच्छाव यांनी वृद्धेला तातडीने मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले. तिथे ६ दिवस उपचार झाल्यानंतर प्रकृती सुधारली. मात्र, रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राने कमालीचे दुर्लक्ष केले. नियमित ड्रेसिंग व काळजी न घेतल्याने वृध्देच्या पायाची जखम पुन्हा गंभीर बनली. सद्यःस्थितीत भारताची वाटचाल कुष्ठरोग निर्मूलनाकडे सुरू आहे. त्यासाठी शासन पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरु असताना बाधित वृद्ध महिलेच्या उपचारांकडे वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अनास्था दाखवली जात असल्याची तक्रार बच्छाव यांनी केली आहे.

एक यंत्रणा सुस्तावली, एक यंत्रणा हलली

​स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाबद्दल तक्रार करत बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी संबंधित वृद्धेला सोबत घेऊन सामान्य रुग्णालय गाठले. तेथे ही बाब वैद्यकीय अधीक्षक डॉ. जितेंद्र डोलारे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्याची दखल घेत वृध्देच्या नियमित उपचारांसाठी तब्बल सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश डॉ. डोलारे यांनी जारी केले. या संवेदनशीलतेबद्दल भाजपच्या शिष्टमंडळाने डॉ. जितेंद्र डोलारे व वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील यांचे आभार मानले. दरम्यान,एका कुष्ठरोग बाधित वृद्ध महिलेला उपचारांसाठी आणि हक्काच्या निवाऱ्यासाठी संघर्ष करावा लागणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असे नमूद करत न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा थांबवणार नाही,असा इशारा बच्छाव यांनी दिला आहे. शिष्टमंडळात दादा जाधव, सामाजिक कार्यकर्ते आप्पा वानखेडे, सागर पाटील, सोनू बच्छाव, राकेश पाटील यांचा समावेश होता.