९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात

नाशिक : छतावरून पडणारे पाणी मुख्य मंडपात येऊ नये याकरिता सभोवताली चर, परिसर चिखलमय होऊ नये म्हणून मुरूम, माती, उपमंडपासह ग्रंथ प्रदर्शन आणि अन्य कक्षांवर पत्र्यांची मजबूत तटबंदी, बदललेल्या कार्यक्रमस्थळी नव्याने व्यासपीठ आणि तत्सम व्यवस्था.. मराठी साहित्य संमेलनासमोर अकस्माक उभ्या ठाकलेल्या अवकाळी पावसाच्या संकटाला तोंड देण्यासाठी गुरूवारी आडगावस्थित भुजबळ नॉलेज सिटी आवारात ‘कुसुमाग्रजनगरी’त युध्दपातळीवर तयारी सुरू होती. पावसाने संमेलनातील कुठल्याही कार्यक्रमात अडथळा येणार नाही, अशी तजविज केली गेल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. या तयारीवर स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी संमेलनस्थळी ठाण मांडून लक्ष ठेवले.

पावसामुळे संमेलनाच्या कुठल्याही कार्यक्रमात व्यत्यय येणार नाही. नाशिकमध्ये देशभरातून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करून नाशिककरांनी साहित्य संमेलनात सहभागी होऊन आनंद घ्यावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले.  संमेलनासाठी सर्व नागरिकांना प्रवेश खुला असून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असताना पावसाने काही कार्यक्रमाच्या स्थळात बदल करावे लागले. मुख्य मंडप जल व अग्निरोधक आहे. त्यातून गळती झालेली नाही. पण छतावरील पाणी दोन बाजूने मंडपात येत होते. तसेच उपमंडपात गळती झाली. पावसामुळे कुठल्याही कार्यक्रमात अडथळे येऊ नये, याकडे आयोजकांनी पूर्ण लक्ष केंद्रीत केले. खुल्या जागेत होणाऱ्या कार्यक्रमाचे स्थळ बदलण्यात आले.

पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने विविध कामे हाती घेतली गेली. गुरूवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पाऊस झाला नाही. त्यामुळे संमेलन स्थळी कामांनी वेग घेतला. मुख्य मंडपाच्या छतावरून पडणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदण्यात आले. मंडपालगतच्या ज्या परिसरात पाणी साचल्याने चिखल झाला होता तिथे मुरूम टाकला गेला. जेणेकरून मंडपात प्रवेश करताना चिखल होणार नाही. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कला संचनालयाच्या मंडपास पावसात गळती लागली होती. त्यावर पत्रे, ताडपत्री आदींचे आच्छादन तसेच संमेलन स्थळावरील ग्रंथ प्रदर्शनात सुमारे २५० कक्ष आहेत तेथेही पत्र्याद्वारे छत मजबूत करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. खुल्या जागेत होणारा कवीकट्टा उपहारगृहालगत, बालकुमार मेळावा संमेलन स्थळात प्रवेश करतानाच्या जागेत होणार आहे. गझल मंच बंदीस्त सभागृहात होईल. बदललेल्या नव्या ठिकाणी व्यासपीठ, ध्वनि आणि तत्सम यंत्रणा उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

कुसुमाग्रज नगरीतील मुख्य सभा मंडप, स्वयंपाकगृह, भोजन व्यवस्था, प्रमुख पाहुण्यासाठी उभारण्यात आलेल्या खोल्या आदींची स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी संमेलन समन्वयक माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत टकले, कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, समाधान जेजुरकर, अमर वझरे यांच्यासह समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.