नाशिक – कुसुमाग्रज प्रतिष्ठान विश्वस्त मंडळातील रिक्त जागेवर मंदार भारदे यांची निवड करताना गोपनीयता बाळगली गेल्याचा आक्षेप प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. भारदे यांचे नाव संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचा दावा केला. सुरेश भटेवरा यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या कार्यवाह पदावर योग्यवेळी निवड केली जाईल. ती व्यक्ती विश्वस्त मंडळातील असेल की बाहेरील ते विश्वस्त ठरवतील, अशी भूमिका संबंधितांनी घेतली आहे.

नवीन विश्वस्त नियुक्तीवरून माजी कार्यवाह सुरेश भटेवरा आणि सल्लागार व विश्वस्त यांच्यात मतभेद झाले होते. भटेवरा यांनी जी नावे सुचविली, ती साहित्य व नाट्य क्षेत्रातील दिग्गज, स्थानिक मंडळी होती. पारदर्शकपणे ही प्रक्रिया पुढे गेल्यानंतर अविश्वास दाखविला गेल्यामुळे भटेवरा हे प्रतिष्ठानमधून तडकाफडकी बाहेर पडले. भटेवरा यांच्या राजीनाम्यामुळे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळातील सदस्य संख्या १० वर आली. घटनेनुसार विश्वस्त मंडळात किमान ११ सदस्य असणे बंधनकारक आहे.

हा निकष पूर्ण करण्यासाठी तूर्तास एकाच सदस्याची नियुक्ती करताना प्रतिष्ठानकडून वेगळ्याच गोष्टींना प्राधान्य दिले, गोपनियता बाळगली गेल्याची चर्चा साहित्य वर्तुळात रंगली. विश्वस्त मंडळातील रिक्त जागेवर हवाई क्षेत्रात कंपनी असणाऱ्या मंदार भारदे यांच्या निवडीबाबत कुठलीही माहिती दिली गेली नव्हती. त्यांचे नाव थेट प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर झळकले. गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर करताना या संदर्भात विचारणा झाल्यावर पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष वसंत डहाके यांच्या उपस्थितीत झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत भारदे यांचे नाव निश्चित झाल्याचे नमूद केले. भारदे यांची संमती मिळाल्यानंतर हे नांव संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले. गोपनियता बाळगण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सूचित केले.

प्रतिष्ठानने ज्यांची नियुक्ती केली, ते भारदे हे हवाई क्षेत्रातील कंपनी चालवितात. त्यांच्या कंपनीने २०२४-२५ या वर्षात जनस्थान पुरस्कार सोहळ्याचे प्रायोजकत्व स्वीकारून दोन लाख रुपयांची देणगी दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. यामुळे देणगीदाराला थेट प्रतिष्ठानचे विश्वस्त होता येते, असा संदेश गेल्याचा काही सभासदांचा आक्षेप आहे. पत्रकार परिषदेत या नियुक्तीवरून प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने सल्लागार ॲड. विलास लोणारी यांनी दुसरे काही विषय सुचत नाही का, असा प्रश्न केला. काहींनी आता विषय पुरस्कार जाहीर करण्याचा असल्याचे नमूद केले. लोकेश शेवडे यांनी आपल्या नियुक्तीची कधीही प्रतिष्ठानने प्रेस नोट दिली नव्हती, उपाध्यक्ष निवडीवेळी प्रतिष्ठानने तसे केले नसल्याचा दावा केला. पुढील वेळी याबाबत काळजी घेतली जाईल. प्रतिष्ठानच्या अध्यक्षांना भारदे यांच्या निवडीची कल्पना होती, असा दावाही विश्वस्तांनी केला.