अनिकेत साठे

नाशिक : राज्यात वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या अनेक महाविद्यालयांसह वसतिगृहात स्वच्छतागृह आणि शौचालयांची स्वच्छता होत नाही. पुरेसे पाणी उपलब्ध नसते. उपाहारगृहांमध्ये अस्वच्छता असते. प्रवेशित विद्यार्थ्यांना पुरेसे वसतिगृहदेखील नाहीत, विद्यार्थिनींची असुरक्षितता, अशा विविध स्वरूपाच्या तक्रारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू का कट्टा या पहिल्याच उपक्रमात मांडण्यात आल्या. आरोग्य विद्यापीठाशी संलग्न राज्यात ४०३ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. या तक्रारींची गंभीर दखल घेत विद्यापीठाने या समस्यांचे तातडीने निराकरण करून विद्यार्थ्यांना सोयी- सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश महाविद्यालयांना दिले आहेत. त्याची स्थानिक चौकशी समितीमार्फत पडताळणी करण्यात येणार आहे. 

राज्यातील ४०३ वैद्यकीय महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू का कट्टा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची संकल्पना कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांची आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी प्रथमच असा उपक्रम राबविला जात आहे. त्या अंतर्गत पहिलाच उपक्रम नुकताच पार पडला. त्याकरिता विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून इ मेलवर प्रश्न मागविले होते. प्राप्त प्रश्नांमधून सर्वसमावेशक प्रश्नांबाबत कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी आभासी पध्दतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पहिल्याच उपक्रमात अनेक महाविद्यालयांतील बिकट स्थितीवर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला. महाविद्यालयांमध्ये उपलब्ध शैक्षणिक तसेच अन्य सुविधांबाबत चर्चेवेळी महाविद्यालयांमध्ये योग्य सुविधा नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यामध्ये पुरेशा वसतिगृह सुविधेचा अभाव, महाविद्यालय आणि वसतिगृहातील स्वच्छतागृह तसेच शौचालयांतील अस्वच्छता, पाणी टंचाई, उपाहारगृहातील अस्वच्छता, विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षा आदींचा समावेश होता. हा संदर्भ देत विद्यापीठाने सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राचार्य, संलग्नित महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांना कार्यवाही करण्याची सूचना केली. या बाबी महाविद्यालयांशी निगडित असल्याने त्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर टाकली गेली आहे.

विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या सोडविल्या गेल्या की नाहीत, याची पडताळणी महाविद्यालयांच्या तपासणीदरम्यान करण्यात येणार आहे. स्थानिक चौकशी समितीकडून त्यांची तपासणी केली जाईल, असेही विद्यापीठाने सूचित केले. कुलगुरू का कट्टा या उपक्रमाचे दर महिन्याला आभासी पध्दतीने आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे महाविद्यालयातील प्रश्नांविषयी विद्यार्थी पुन्हा दाद मागू शकतात.

कुलगुरू का कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची कुलगुरूंनी गंभीरपणे दखल घेतली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची उपाययोजना, महाविद्यालय आणि वसतिगृहातील स्वच्छतागृह, शौचालयांमध्ये स्वच्छता ठेवणे, उपाहारगृहांमध्ये स्वच्छता राखणे, नियमित व मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध राहील, याबाबत महाविद्यालयांना दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात वसतिगृह उपलब्ध करून देण्याची महाविद्यालयांची जबाबदारी आहे.

– डॉ. कालिदास चव्हाण (कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ)