जळगाव : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना ई-केवायसी करूनही १५०० रूपये अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. महिला व बालविकास विभागाने १८१ क्रमांकाची हेल्पलाईन कार्यान्वित केली तसेच त्रूटी दुरूस्तीसाठी अर्ज स्वीकारले. तरीही संबंधित महिलांना रखडलेले अनुदान मिळू शकलेले नाही. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांकडे त्रूटी दूर करण्याचे काम सोपविण्यात आले आहे.

राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, लाखो महिलांनी अर्ज करून ई-केवायसी प्रक्रियाही पूर्ण केली आहे. मात्र, ई-केवायसी करूनही अनेक पात्र महिलांच्या खात्यात अद्याप अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनुदान रखडण्यामागे तांत्रिक अडचणी, आधार क्रमांक, बँक खाते आणि मोबाईल क्रमांकातील विसंगती, तसेच काही अर्जांमधील माहितीतील त्रुटी कारणीभूत असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात येत आहे.

त्रूटी दुरूस्तीसाठी महिला व बालविकास विभागाने १८१ क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली आहे. याशिवाय, ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रियाही राबवण्यात आली आहे. मात्र, इतके उपाय करूनही अनेक महिलांच्या समस्यांचे निराकरण झालेले नाही. हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतरही ठोस उत्तर मिळत नसल्याच्या किंवा तिकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी महिलांकडून करण्यात येत आहेत. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दिलासा देण्याचा असताना, प्रत्यक्षात अनुदान न मिळाल्याने अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही पैसे खात्यात जमा न झाल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काही ठिकाणी तर महिलांना अर्ज पुन्हा करावा लागल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.

दरम्यान, महिला व बालविकास विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रखडलेल्या अनुदानासाठी आणि अर्जांमधील त्रुटी दूर करण्याची जबाबदारी थेट अंगणवाडी सेविकांकडे सोपविली आहे. गावपातळीवर महिलांशी थेट संपर्क असलेल्या अंगणवाडी सेविका लाभार्थी महिलांची माहिती तपासणार आहेत. आधार, बँक खाते, ई-केवायसी आणि इतर आवश्यक कागदपत्रांमधील त्रुटी दुरुस्त करण्याचे काम त्या करणार आहेत. यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असा विभागाचा दावा आहे. मात्र, अंगणवाडी सेविकांवर आधीच विविध योजनांची जबाबदारी असल्याने आता आणखी एक अतिरिक्त काम दिल्यामुळे त्यांच्यावर ताण वाढण्याची शक्यता आहे. तसेच, ही प्रक्रिया नेमकी किती कालावधीत पूर्ण होणार आणि रखडलेले अनुदान महिलांच्या खात्यात कधी जमा होणार, रखडलेले मागील सर्व अनुदान एकत्र मिळेल का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

जळगावमध्ये एक लाखांवर महिला वंचित

ई-केवायसी करूनही दरमहा मिळणारे १५०० रूपयांचे अनुदान रखडलेल्या महिलांची संख्या एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे एक लाख ०८ हजार इतकी आहे. संबंधित महिलांची यादी तालुकास्तरावर पाठविण्यात आली आहे. आणि मंगळवारी सायंकाळपर्यंत त्या-त्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे याद्या सोपविल्या जातील, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी लोकसत्ताला दिली. संबंधित महिलांनी घाबरून न जाता अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा. सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत आणि त्रुटी आढळल्यास तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.