नाशिक- तीन वर्षातून एकदा येणारा अधिक मास म्हणजेच ग्रामीण भाषेत धोंड्याचा महिना सध्या सुरु आहे. या महिन्यात लेकीला आणि जावयाला म्हणजेच दाजींना वाण देण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे सध्या महाराष्ट्रात सर्वत्र दाजींना सुगीचे दिवस आहेत. घरोघरी दाजींची पूजा करुन त्यांना त्या त्या कुटूंबाच्या ऐपतीप्रमाणे वाण दिले जात आहे. त्यामुळे दाजी मंडळी सुखात असताना त्यांच्या या आनंदात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका घोषणेने मिठाचा खडा पडला. आणि दाजी मंडळींचा आनंद कुठल्या कुठे पळून त्यांना घाम फुटला आहे.
राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापित होण्यामागे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचे कोणी नाकारु शकत नाही. लाडक्या बहिणींनी भरभरुन मतदान केल्याने महायुती पुन्हा सत्तेत आली. तेव्हांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेतच आहे. सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वगळण्यात येणाऱ्या लाडक्या बहिणींमुळे गाजत आहे. या योजनेतून ८१ लाख महिला अपात्र ठरल्या असल्या तरी, त्यांच्याकडून आतापर्यंत मिळालेल्या पैशांची वसुली होणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला.
महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण ‘ योजनेतून ८१ लाख महिला अपात्र ठरल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या महिलांना यापुढे योजनेचा लाभ आणि दरमहा मिळणारे १५०० रुपये मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. सरकारच्या या भूमिकेवर विरोधकांनी टीकास्त्र सोडले. अपात्र ठरलेल्या लाखो महिलांना आतापर्यंत लाभ दिलाच कसा, तेव्हांच का तपासणी करण्यात आली नाही, दिलेल्या पैशांची वसुली त्यांच्याकडून करण्यात येणार का, असे प्रश्न उपस्थित झाले. मुळात ८१ लाख महिला अपात्र ठरल्याने आता लाभार्थी महिलांची संख्या एकदम कमी झाली. केवळ १ कोटी ६६ लाख महिला या योजनेच्या लाभार्थी ठरल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा योजनेच्या लाभाची रक्कम जमा होईल. परंतु, ज्या महिला अपात्र ठरल्या, त्यांना जी रक्कम इतके महिने देण्यात आली, त्याची वसुली होणार का, असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. त्यामुळे असा लाभ घेणाऱ्या महिला अस्वस्थ झाल्या. परंतु, त्यांना दिलासा देणारी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अपात्र ठरलेल्या महिलांकडून पैसे वसूल करण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, धोंड्याच्या महिन्यामुळे आनंदोत्सवात असणाऱ्या दाजींच्या आनंदात मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरजण घातले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केवळ महिलांसाठी असताना हजारो पुरूषांनीही या योजनेचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, महिलांसाठीच्या योजनेचा सरकारी यंत्रणेकडून पुरुषांनाही लाभ देण्यात आला. या योजनेतील लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आल्यावर १४ हजार पुरूषांनी महिलांच्या नावे अर्ज करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत, पैसे लाटल्याचे उघड झाले. सरकारला लुटणाऱ्या अशा या दाजी मंडळींकडून आता पैसे वसूल केले जाणार आहेत. त्यामुळे दाजी मंडळी हादरले आहेत.
