माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सकाळी शास्त्री टॉवर येथे अभिवादन करण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आले. मात्र, त्यांना टॉवरचा दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपाने महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करीत दरवाजाला हार घालून प्रशासनाचा निषेध केला.

हेही वाचा- नाशिक : स्वच्छ, हरित देवळाली छावणी मंडळ देशात प्रथम

सकाळी नऊला भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते शास्त्री टॉवर येथे गेले. मात्र, शास्त्री टॉवरच्या दरवाजाला कुलूप लावलेले आढळून आले. यावर भाजपाने तीव्र नाराजी व्यक्त करीत टॉवरच्या मुख्य दरवाजाला पुष्पहार घालून तीव्र निषेध करीत महापालिकाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा- केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा निकाल जाहीर; जळगाव ८४, तर भुसावळ ९८ व्या स्थानी

याप्रसंगी महानगराध्यक्ष सूर्यवंशी यांनी महापुरुषांची जयंतीही जळगावकर साजरे करू शकत नाहीत. त्यांना मानवंदना करू शकत नाहीत, यापेक्षा मोठी अपमानकारक गोष्ट नाही, असे सांगितले. यासंदर्भात महापालिका अधिकार्‍यांशी नगरसेवक व जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांनी संपर्क करीत चौकशीही केली. मात्र, अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आज सुट्टीचा दिवस आहे, चावीची व्यवस्था होऊ शकली नाही, असे उत्तर देण्यात आले. आयुक्तांशीही भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत महापालिका प्रशासनाने या बाबीची दखल घ्यावी व संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केल्याचेही सांगितले.