भाषा, लेखक आणि लोकशाही परिसंवाद भाषा समृद्ध होणे आवश्यक !

राऊत यांनी पत्रकारितेत वार्ताकन करताना भाषेला मर्यादा येत असल्याने भाषेचा कस लागतो, असे मांडले.

कुसुमाग्रज नगरीत लेखक, भाषा आणि लोकशाही या परिसंवादात सहभागी डॉ. दीपक पवार, श्रीकांत देशपांडे, दिनकर गांगल, दीप्ती राऊत, इब्राहिम अफगाण, रवींद्र पंढरीनाथ आदी.

संमेलनातील भाषा, लेखक आणि लोकशाही परिसंवादातील सूर

कुसुमाग्रज नगरी, नाशिक : लोकशाही हा लोकजीवनाचा भाग असून लोकांनी लोकांसाठी चालवलेली व्यवस्था असताना त्याला कुठल्याही विषयाचे वावडे नको. समाजातील सर्व घटकांच्या प्रश्नांचे प्रतिबिंब यामध्ये उमटताना बोलीभाषेचा वापर होणे गरजेचे आहे. लेखक हा संदेश वाहक असल्याने ही बदलती स्थित्यंतरे त्याने टिपली पाहिजेत. परंतु, हे विषय कवेत घेण्याइतकी भाषा समृद्ध झाली का, असा प्रश्न भाषा, लेखक आणि लोकशाही या विषयावर आयोजित परिसंवादात उपस्थित करण्यात आला.

येथील मराठी साहित्य संमेलन नगरीत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या वतीने भाषा, लेखक आणि लोकशाही या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल, लेखक रवींद्र पंढरीनाथ, पत्रकार इब्राहिम अफगाण, दीप्ती राऊत, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सहभाग घेतला. डॉ. दीपक पवार यांनी सूत्रसंचालन केले. गांगल यांनी लोकशाही हा विषय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येण्याचे कारण म्हणजे साहित्य सर्वसमावेशक असते, असे सांगितले. लोकशाही हा लोकजीवनाचा भाग आहे. लोकशाहीत भावना महत्त्वाची असून व्यक्तिस्वातंत्र्य मान्य करायला हवे. मात्र लोकशाहीत हेच स्वातंत्र्य संकुचित होते, याकडे गांगल यांनी लक्ष वेधले. राऊत यांनी पत्रकारितेत वार्ताकन करताना भाषेला मर्यादा येत असल्याने भाषेचा कस लागतो, असे मांडले. समाजाच्या कक्षा रुंदावत असताना भाषा कवेत घेत आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे सारं साहित्यात प्रतििबबित होताना लेखन, लोकशाही, पत्रकारिता साऱ्यांची कसोटी लागेल. समाज, साहित्य, निवडणूक निर्णय अधिकारी याची नोंद कधी आणि कशी घेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अफगाण यांनी हाच धागा पकडत लेखक म्हणजे ज्याला व्यक्त होता येईल अशी व्यक्ती तर, भाषा उत्क्रांत होण्याचे साधन असल्याचे सांगितले. आपण लोकशाही दोषासहित स्वीकारली. अद्याप त्याला पर्याय मिळालेला नाही. हे बदलण्यासाठी दीर्घ लढा द्यावा लागेल, असे त्यांनी नमूद केले. पंढरीनाथ यांनी लोकशाही म्हणजे बहुविविधता तशीच भूविविधताही असल्याचे सांगितले. भूविविधतेमुळे बोलीभाषा संविधान होऊ शकते. ही ताकद ओळखायला हवी. लोकशाही संकटात असल्याचे आपण मान्य करायला हवे. लोकशाहीचे अवकाश संकुचित होत असताना त्यांना विरोध होणे गरजेचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Language writer and democracy discussion in 94 marathi sahitya sammelan zws