नाशिक – मध्य रेल्वेने २०२६-२७ या वर्षासाठी ९५ मालधक्क्यांचे वार्षिक वर्गीकरण जाहीर केले आहे. माल वाहतुकीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ११ माल धक्क्यांना उच्च गट श्रेणीत स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, यात लासलगाव रेल्वे माल धक्का गट तीनवरून गट एकमध्ये श्रेणी सुधारित करण्यात आला. लासलगाव ही कांद्याची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. देशभरात येथून कांदा रेल्वेद्वारे पाठविला जातो. लासलगाव मालधक्क्याचा उच्च श्रेणीत समावेश झाल्याने जिल्ह्यातील कृषी व माल वाहतुकीसाठी ही महत्वाची घडामोड मानली जात आहे.
मध्य रेल्वेने यंदा एकूण ९५ मालधक्क्यांचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार गट एक मध्ये ४२, गट दोनमध्ये १२ आणि गट तीनमध्ये ४१ माल धक्क्यांचा समावेश आहे. उच्च श्रेणीत स्थान मिळवणाऱ्या ११ मालधक्क्यांच्या यादीत नागपूर विभागातील सहा, पुणे विभागातील दोन, सोलापूर विभागातील दोन तर भुसावळ विभागातील एकमेव लासलगाव मालधक्क्याचा समावेश आहे. वाढती मालवाहतूक, सुधारलेली कार्यक्षमता आणि रेल्वेच्या मालसेवांतील वाढता वापर यामुळे ही श्रेणीसुधारणा करण्यात आली आहे. मध्य रेल्वे कार्यक्षम माल हाताळणीला प्रोत्साहन देण्यासाठी, वॅगनचा विलंब कमी करण्यासाठी आणि माल वाहतुकीच्या कामकाजाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी माल धक्क्यांचे वर्गीकरण एक महत्वाचा उपाय मानला जातो. मालधक्क्यावरील मालाची जलद चढ-उतार प्रक्रिया, रेल्वे वॅगनचा कमी होणारा थांबा, रेल्वे परिसराचा पुरेपूर वापर करणे आणि मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढविणे या निकषांवर हे वर्गीकरण करण्यात आले आहे. सुधारित वर्गीकरण एक जुलै २०२६पासून लागू झाले आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. लासलगाव रेल्वे माल धक्क्याहून देशातील विविध भागात रेल्वेने कांद्यासह धान्य व कृषिमाल पाठविला जातो. मालधक्क्याला गट-१चा दर्जा मिळाल्यामुळे येथील मालवाहतुकीचे नियोजन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल. रेल्वेच्या मालवाहतूक सुविधांमध्ये सुधारणा झाल्याने व्यापारी, निर्यातदार आणि शेतकऱ्यांनाही अप्रत्यक्ष फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
माल धक्क्यावरील शुल्क
रेल्वे माल धक्क्यावर सर्व प्रकारच्या वॅगन्ससाठी (मोफत वेळ संपल्यानंतर) प्रति वॅगन प्रति तास या तत्वावर शुल्क आ्कारणी केली जाईल. गट क्रमांक एकमध्ये १५० रुपये प्रति वॅगन प्रति तास, गट क्रमांक दोनसाठी १२० रुपये प्रति वॅगन रुपये प्रति तास आणि गट तीनमध्ये ७५ रुपये प्रति वॅगन प्रति तास अशी शुल्क आकारणी होणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
रेल्वे प्रशासनाचे आवाहन
रेल्वे प्रशासनाने व्यापाऱ्यांना विनामूल्य कालावधीतच मालाची चढ-उतार प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. निर्धारित वेळेनंतर मालधक्क्यावर वॅगन थांबल्यास गटनिहाय जादा शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे मालाची वेळेत हाताळणी केल्यास अतिरिक्त खर्च टाळता येईल आणि वॅगनची उपलब्धताही वाढेल, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
