गरोदर मातेच्या मृत्यूस डॉक्टरांना कारणीभूत धरत त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी मृत महिलेच्या नातेवाईकांनी चांदवड येथील पोलीस ठाण्यात मृतदेह आणून ठिय्या दिला. सायंकाळी उशिरापर्यंत नातेवाईकांचे आंदोलन सुरुच होते.चांदवड येथील प्रियंका निरभवणे यांची प्रसुतीनंतर तब्येत बिघडली. तीन महिन्यापूर्वी त्यांची प्रसुती झाली होती. तब्येत बिघडल्याने चांदवड, पिंपळगाव, नाशिक तसेच मुंबईतील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>> सप्तश्रृंग गडावर नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

या प्रकाराने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह थेट चांदवड पोलीस ठाण्यात आणला. उपचारासाठी लाखो रुपयांची रक्कम उकळूनही योग्य उपचार झाले नाहीत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रियंकाचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संबंधितांवर कायेदशीर कारवाई करा, अशी मागणी करत पोलीस ठाण्याच्या आवारातच ठिय्या दिला. संबंधितांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. सकाळी ११ वाजेपासून सायंकाळपर्यंत नातेवाईक पोलीस ठाण्याच्या आवारातच होते. चांदवड पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत घालण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरु होते.सायंकाळी उशीरा जिल्हा शल्य चिक्तिसकांसह अन्य अधिकाऱ्यांची या विषयावर बैठक सुरू होती. पोलीस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.