नाशिक : गलवान खोऱ्यातील पीपी-१४ जवळ १५ जून २०२० च्या रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये धुमश्चक्री उडाली. बंदुकांच्या वापरास मनाई असल्याने या चकमकीत दगड, गज, काठ्या आणि धारदार शस्त्रांच्या वापर करण्यात आला. अंधारात सुमारे सहा तास चाललेल्या या संघर्षात दोन्ही बाजूंचे ६०० ते ९०० सैनिक सहभागी झाले होते. या संघर्षात भारताचे २० सैनिक शहीद तर ७६ सैनिक जखमी झाले. दहा भारतीय सैनिकांना बंदी बनविण्यात आले; त्यांची नंतर सुटका करण्यात आली. चिनी सूत्रांनुसार, ‘पीएलए’च्या ३५ ते ४५ सैनिकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शहीद भारतीय सैनिकांचे पार्थिव गलवान आणि श्योक या गोठवून टाकणाऱ्या थंड नद्यांमधून बाहेर काढण्यात आले.

महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने भारतीय लष्कराने लेहमधील कारू भागात उभारलेल्या त्रिशूल युद्ध संग्रहालयाचे लोकार्पण मंगळवारी गलवान खोऱ्यातील संघर्षात शहीद झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत साधेपणाने झाले. संग्रहालयात गलवान खोऱ्यातील संघर्षाची रोमहर्षक गाथा, शहीद जवानांची छायाचित्रे आणि त्यांच्या शौर्याची माहिती मांडण्यात आली आहे. ती पाहताना सैनिकांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू आले.

या सोहळ्यास संग्रहालयाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करणारे लेफ्टनंट कर्नल सुजित भोसले (निवृत्त) आणि भाजपच्या नाशिक उपाध्यक्षा ॲड. मिनल वाघ-भोसले यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा, फायर अँड फ्युरी कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल मदनराज पांडे, तसेच थ्री इन्फंट्री डिव्हिजनचे मेजर जनरल सचिन मेहता यावेळी उपस्थित होते. गलवान खोऱ्यातील संघर्षात शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांच्या वीरपत्नी बिकुमाला संतोषी यांच्या हस्ते संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले.

एकीकडे चीन आणि दुसरीकडे पाकिस्तानला भिडणाऱ्या सीमांची जबाबदारी भारतीय लष्कराची त्रिशूल डिव्हिजन सांभाळते. दोन्ही आघाड्यांवर सतर्क राहावे लागणारे हे अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षातही डिव्हिजनच्या जवानांनी घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना पिटाळून लावले होते. अतिशय कठीण भूप्रदेश आणि प्रतिकूल हवामानात पूर्व लडाखच्या सीमांचे रक्षण करताना भारतीय लष्कराने बजावलेली भूमिका आणि त्यांचा समृद्ध इतिहास लक्षात घेऊन ‘रेझांग ला’ युद्ध स्मारकाच्या धर्तीवर देशाला एक संग्रहालय समर्पित करण्याची संकल्पना पुढे आली. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. लष्कराच्या उपक्रमात एखाद्या राज्याने अशा प्रकारे सहभाग नोंदविण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले.

सप्टेंबर २०२३ मध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या संग्रहालयाची पायाभरणी झाली. मंगळवारी हे संग्रहालय खुले करण्यात आले. गौरवशाली इतिहास लाभलेल्या त्रिशूल डिव्हिजनच्या कामगिरीचा पट या संग्रहालयातून उलगडण्यात आला आहे. या संग्रहालयाची वास्तुरचना पुण्यातील वास्तुविशारद प्राजक्ता कळमकर आणि नाशिकचे अक्षय लुणावत यांनी विनामूल्य केली.

संग्रहालयाची वैशिष्ट्ये

त्रिशूल आकारावर आधारित या संग्रहालयाची रचना आहे. यातील एका दालनात गलवान खोऱ्यातील संघर्षाची गाथा मांडण्यात आली आहे. सीमेवर तैनात भारतीय लष्कराच्या अतुलनीय साहस आणि शौर्याचा अनुभव येथे मिळतो. लष्कराच्या उत्तर कमांडच्या अखत्यारीतील त्रिशूल डिव्हिजनने आजवर अनेक मोहिमांमध्ये शौर्याचे प्रदर्शन घडविले आहे. या मोहिमांमध्ये शहीद झालेल्या अधिकारी आणि जवानांची नावे झाडाच्या पानांवर कोरण्यात आली आहेत. त्यांनी गाजविलेल्या शौर्याची गाथा, त्याबद्दल मिळालेले लष्करी सन्मान आणि अन्य तपशील मोहिमेनुसार देण्यात आले आहेत. चीनशी झालेल्या पहिल्या युद्धापासून आजवरच्या विविध मोहिमांमध्ये वापरण्यात आलेली शस्त्रास्त्रे, लष्करी वाहने आणि दारुगोळाही येथे पाहता येतो. संघर्षात शत्रूकडून हस्तगत करण्यात आलेल्या वस्तूंचाही संग्रहालयात समावेश आहे. त्यात विविध शस्त्रास्त्रे, दारुगोळा, ओळखपत्रे, कुटुंबीयांकडून आलेली तसेच सैनिकांनी पाठविलेली पत्रे आणि संपर्क साधनांचा समावेश आहे.