नाशिक : शहर परिसरातील गंगापूर गावात बिबट्या जेरबंद करण्यात चोवीस तास उलटत नाही तोच महात्मानगरमधील वनविहार कॉलनीत बिबट्याने शुक्रवारी धुमाकूळ घातला. या परिसरात अचानक आलेल्या बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. वन विभाग आणि पोलिसांकडून बिबट्याला पकडण्यासाठी त्यानंतर शर्थीने प्रयत्न सुरु करण्यात आले.
मागील काही महिन्यांपासून शहरात बिबट्यांचा संचार वाढला आहे. गंगापूर भागातील शिवाजीनगर येथील सुनील पाटील यांच्या मालकीच्या गटात बिबट्याचा असणारा वावर पाहता या ठिकाणी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यात गुरूवारी एक ते दीड वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला. याबाबत वनविभागाला परिसरातील नागरिकांनी माहिती देताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्यास तात्काळ ताब्यात घेत म्हसरूळ येथील वन्यजीव उपचार केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकाराला काही तास उलटत नाही तोच महात्मा नगर परिसरातील वनविहार कॉलनी या ठिकाणी शुक्रवारी दोन बिबटे शिरले. दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर तुरळक गर्दी होती. बिबट्याने रस्त्यावरील काही नागरिकांवर हल्ला चढविला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोनहून अधिक नागरिक जखमी झाले.
दरम्यान, बिबट्या नागरी वसाहत परिसरात शिरला. हा परिसर बंगले, सदनिकांचा आहे. बिबट्या आपल्या भागात आल्याची माहिती समजताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही घरात बंदिस्त झाले. काही बिबट्याला पाहण्यासाठी बाहेर पडले. या गर्दीचा फटका वनविभागाला बसला. गर्दी, आवाज यामुळे बिबट्या बिथरल्याने तो इकडे- तिकडे धावत राहिला. बिबट्या जवळच्या एका बेकरीमध्ये अडकल्यावर त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिक पोलीस तसेच वनविभागाचे विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळविणे आणि बिबट्याच्या शोध मोहिमेत सहभाग घेतला. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, नाशिक शहर परिसरात आतापर्यंत बिबट्याने अनेकदा हल्ले केले आहेत. सहा महिन्यात बिबट्याच्या हल्लात दोन बालकांचा मृत्यू झाला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पाथर्डी परिसरात आयुष भगत या अकरा वर्षाच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दोन महिन्यांपूर्वी आर्टिलरी सेंटर परिसरात बिबट्याच्या हल्लात श्रृतीक गंगाधरण या दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
