मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून मालेगाव तालुक्यात ठिकठिकाणी मानवी वस्त्यांच्या परिसरात बिबट्यांचा संचार वाढला आहे. त्यामुळे लोकांमध्ये बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. रविवारी पहाटे पिंपळगाव शिवारातील गंगासागर वस्तीत बिबट्याने असाच धुमाकूळ घातला. तेथील शेतकऱ्याच्या सहा शेळ्या व एका बोकडाचा बिबट्याने फडशा पाडण्याची घटना घडली आहे.

गंगासागर वस्तीजवळील रामचंद्र पवार यांनी राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शेळ्या बांधून ठेवल्या होत्या. रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे या शेळ्यांना चारा,पाणी करण्यासाठी शेडमध्ये गेल्यावर सहा शेळ्या व एक बोकड मृत्युमुखी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पवार यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी प्रजापत काठेवाडी जातीच्या सहा शेळ्या व एक बोकड त्यांनी आणला होता. शेळ्यांना ज्या शेडमध्ये बांधून ठेवण्याची व्यवस्था त्यांनी केली होती, त्या शेडची जमिनीलगतची जाळी वाकवून पहाटे केव्हातरी बिबट्याने आतमध्ये प्रवेश केला असावा. या घटनेत बिबट्याने सर्वच्या सर्व सहा शेळ्या व एका बोकडावर हल्ला चढवत त्यांचा फडशा पाडला आहे.

ही घटना समजल्यावर वस्तीतील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सकाळी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वन खात्याला कल्पना देण्यात आली. त्यानुसार वनपाल सोनल पवार व वनरक्षक दीपक हिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेत पवार यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्याची ही वार्ता पंचक्रोशीत पसरल्यावर सर्वत्र खळबळ उडाली असून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी गाई, म्हशी, बैल, शेळी, बोकड आदी पाळीव जनावरांची नीट काळजी घ्यावी, जंगली हिंस्त्र प्राण्यांपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी आपल्या निगराणीखाली योग्य व्यवस्था करावी,असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

अवकाळी पावसामुळे कापणी लांबणीवर पडल्याने तालुक्यातील अनेक भागातील मका पीक अद्याप उभे असल्याचे दृश्य आहे. अशा उभ्या मका पिकाच्या शेतामध्ये बिबटे लपून बसत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये बिबट्यांचे दर्शन होत असल्याचे सांगण्यात येते. पंधरा दिवसांपूर्वी पिंपळगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक गोऱ्हा ठार झाला होता. गेल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्गावरील सौंदाणे येथील झाडी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास बिबट्या मुक्तपणे संचार करीत असल्याचे दृश्य दिसले होते. काटवन भागातील कजवाडे, पोहाणे, रामपुरा, चिंचवे,विराणे परिसरातही अनेकदा लोकांना बिबट्याचे दर्शन होत असल्याचे सांगितले जात आहे. मानवी वस्त्यांच्या परिसरात वावर वाढत असल्याने बिबट्यांची दहशत निर्माण होत असून वनखात्याने त्यांचा बंदोबस्त करावा, असा आग्रह नागरिकांकडून धरण्यात येत आहे.