धुळे : शिरपूर तालुक्यातील अर्थे (बु.) शिवारात दोन वर्षीय बालक योगेश पर्मिया सोंगळ याच्यावर हल्ला करून त्याचा बळी घेणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. ९ सप्टेंबर रोजी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहिमेला आज यश आले. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने अर्थे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

अर्थे (बु.) शिवारात ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली होती. मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील आत्मज (पोस्ट सुस्तीखेडा) येथील पुर्मिया कमल सोंगळ हे शेतमजूर म्हणून अर्थे येथील शेख रऊफ शेख सुलेमान खाटीक यांच्या गट क्रमांक ५७ मधील शेतात वास्तव्यास आहेत. सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा दोन वर्षीय मुलगा योगेश पर्मिया सोंगळ हा घरासमोरील अंगणात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली.

क्षणार्धात बिबट्याने योगेशला जबड्यात पकडून शेताच्या दिशेने ओढून नेले. मुलाला वाचविण्यासाठी आई-वडिलांनी जीवाची पर्वा न करता बिबट्याचा पाठलाग केला. मात्र, बिबट्या दाट पिकांमध्ये पसार झाला. या घटनेनंतर संपूर्ण शिरपूर तालुक्यात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस आणि ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. उपवनसंरक्षक मोहन नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकांनी परिसरात थर्मल ड्रोन, ट्रॅप कॅमेरे आणि विशेष पथकांच्या माध्यमातून रात्रंदिवस शोध घेतला. मात्र, केळी, ऊस, पपई, तूर आणि कापूस या दाट पिकांमुळे बिबट्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. शोधमोहिमेदरम्यान दुसऱ्या दिवशी तुरीच्या शेतात योगेशचे काही अवशेष आढळून आले होते. डोक्याचा काही भाग, एक हात आणि पंजासह शरीराचे काही अवशेष मिळून आले होते. या दुर्दैवी घटनेनंतर अर्थे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, योगेश पर्मिया सोंगळ या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर अर्थे (बु.) परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण होते. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. वनविभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंजरे लावण्यासह ड्रोन, ट्रॅप कॅमेरे आणि विशेष पथकांच्या माध्यमातून शोधमोहीम वेगाने राबविली.

गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. अखेर आज वनविभागाच्या प्रयत्नांना यश आले असून, चिमुकल्या योगेशचा बळी घेणारा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील शेतमजूर, शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बिबट्या पकडल्यानंतर वनविभागाकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, लहान मुलांना उघड्यावर किंवा घराबाहेर एकटे सोडू नये आणि शेतात काम करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. योगेश पर्मिया सोंगळ या चिमुकल्याच्या मृत्यूने संपूर्ण शिरपूर तालुका हळहळला होता. अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासन आणि वनविभागाच्या कारवाईचे स्वागत केले आहे.