‘निसर्ग कट्टा’ उपक्रमात सुनील वाडेकर यांचे प्रतिपादन

मानवाने जंगलांवर केलेले अतिक्रमण, वृक्षतोड, पिण्याच्या पाण्याची कमतरता आदी कारणांमुळे बिबटय़ा शहराकडे येऊ लागला असून उसाची शेती त्याचे आश्रयस्थान झाले आहे. बिबटय़ा शहरात कुठे नजरेस पडल्यास गर्दी करू नये तसेच त्याला पकडण्याचे धाडस करू नये, असा सावधगिरीचा इशारा वन विभागाचे अधिकारी सुनील वाडेकर यांनी दिला आहे.
नेचर क्लब ऑफ नाशिक यांच्या वतीने ‘निसर्ग कट्टा’ उपक्रमातर्गत आयोजित कार्यक्रमात वाडेकर यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर ज्येष्ठ पक्षिमित्र दिगंबर गाडगीळ, पशू वैद्यकीय साहाय्यक आयुक्त डॉ. संजय गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा उपस्थित होते. आतापर्यंत वाडेकर यांनी शंभर बिबटय़ांना सुरक्षितपणे जाळ्यात पकडून त्यांना परत जंगलात सोडले आहे. बिबटय़ा हा संरक्षित वन्यजीव असून त्याला बंदिस्त ठेवता येत नाही. कार्यक्रमात प्रारंभी बिबटय़ामध्येही प्रेम असते हे दर्शविणारा लघुपट दाखविण्यात आला. आनंद बोरा यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. कट्टय़ावर निसर्गविषयक घडामोडींची चर्चा घडवून आणली जाणार असून निसर्गाशी संवाद साधण्याची संधी यामुळे मिळणार असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमात अनेक नाशिककरांनी मत मांडले.
पक्षिमित्र अनिल माळी यांनी शहरात मोठय़ा प्रमाणात बिबटे निघत असल्याने ‘लेपर्ड सफारी’ हा उपक्रम वन विभागाने राबविण्याची सूचना केली. वन्यजीव छायाचित्रकार किशोर वडनेरे यांनी बिबटय़ा स्वत:मध्ये बदल करू पाहत असून तो आता वाहनांचा पाठलाग करू लागल्याचे नमूद केले. गाडगीळ यांनी नदीजवळ होणाऱ्या काँक्रीटीकरणामुळे वन्यजीवन धोक्यात येत असल्याचा इशारा दिला. रमेश वैद्य यांनी वन विभागाने संयुक्त वन व्यवस्थापन योजना प्रामाणिकपणे राबविण्याची सूचना केली. बिबटय़ा शहरात आल्यावर गर्दी टाळणे, त्या परिसरातील नागरिकांना इतरत्र हलविणे, त्याच्याशी छेडछाड न करणे अशा सूचना केल्या. सूत्रसंचालन सलोनी वाघमारे यांनी केले. आभार प्रा. कुणाल कुरे यांनी मानले.