scorecardresearch

बिबटय़ामुळे धडकी.!

नाशिकरोडच्या नागरी वसाहतीत शिरलेल्या बिबटय़ाने वेगवेगळय़ा ठिकाणी भटकंती करीत नागरिकांना धडकी भरवली.

नाशिकरोडला नागरी वसाहतीत बिबटय़ाचा संचार; सात तासानंतर वन विभागाकडून जेरबंद

नाशिक : नाशिकरोडच्या नागरी वसाहतीत शिरलेल्या बिबटय़ाने वेगवेगळय़ा ठिकाणी भटकंती करीत नागरिकांना धडकी भरवली. अखेर सात तासापेक्षा अधिक वेळेनंतर वन विभागाने एका बंगल्याच्या वाहनाखाली लपलेल्या बिबटय़ाला इंजेक्शन देत बेशुध्द करुन जेरबंद केले. नाटय़मय घडामोडीत बिबटय़ा जेरबंद झाल्याने मोठय़ा संख्येने जमलेल्या बघ्यांनी आणि वन विभागासह पोलिसांनीही सुटकेचा श्वास सोडला. नाशिक शहर परिसरात बिबटय़ाचा संचार नवा नाही. याआधीही शहरातील नागरी वसाहतीत बिबटय़ा येण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. सोमवारी सकाळी सहा वाजता के. जे. मेहता विद्यालयामागे असलेल्या बंगल्याच्या मोकळय़ा जागेत बिबटय़ा दिसल्यानंतर परिसरातील कुत्र्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरूवात केली. राजेंद्र गायकवाड या रहिवाश्याच्या नजरेस बिबटय़ा पडल्यावर त्यांनी वन विभाग आणि पोलिसांना कळविले. वन विभाग एकिकडे बिबटय़ाचा शोघ घेत असताना तो नाशिकरोड परिसरातील वेगवेगळय़ा भागांमध्ये मुक्त संचार करत होता. सकाळी १० च्या सुमारास बिबटय़ाचा थांगपत्ता लागल्यावर वनविभागाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, वन विभागाला तुरी देत बिबटय़ाने पळ काढला.

सदगुरू नगरातील अ‍ॅड. सोमनाथ गायकवाड यांच्या बंगल्यात बिबटय़ा शिरला. त्यावेळी गायकवाड यांची पत्नी संगीता या कपडे धुत होत्या. त्यांना धडक देत बिबटय़ाने संरक्षक भिंतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. भिंत उंच तसेच भिंतीला गज असल्याने तो आपटून खाली पडला. यामुळे तो अधिकच  चवताळला. बाजूला उभ्या असलेल्या मारूती सुझूकी या चारचाकी वाहनाखाली तो लपून बसला. वन विभागाचे पथकही त्या ठिकाणी दाखल झाले. ट्रान्क्युलाझर बंदुकीच्या सहाय्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबटय़ाला बेशुध्द होण्याचे इंजेक्शन दिले. बिबटय़ा बेशुध्द झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, बिबटय़ाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली. काहींनी त्याला पळवून लावण्यासाठी दगड मारले. बघ्यांच्या गोंधळामुळे वनविभागाला मदत कार्यात अडचणी आल्या. वनविभागाने पकडलेला बिबटय़ा तीन वर्षांचा नर आहे. दोन दिवसानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडायचे की अन्य ठिकाणी न्यावयाचे, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

बिबटय़ाची भटकंती

सोमवारी सकाळी सहा वाजता जय भवानी रोड येथील राजेंद्र गायकवाड यांच्या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या उद्यानात बिबटय़ा दिसला. त्यानंतर तो फर्नाडिसवाडी परिसरातील सुनील बहनवाल यांच्या घरात शिरला. त्यावेळी त्यांचा मुलगा पलंगावर झोपलेला होता. कुटूंबातील अन्य सदस्यांनी आवाज केल्याने बिबटय़ा तेथून बाहेर पडला. के. जे. मेहता हायस्कूलच्या मागे असलेल्या एका बंगल्याच्या आवारात तो लपला. वनविभागाचे कर्मचारी तसेच गर्दीला पाहून तो पळाला. एका वृध्दावरही त्याने हल्ला केला. बिबटय़ा गर्दीला घाबरुन एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात पळत होता. सदगुरू नगरातील अ‍ॅड. गायकवाड यांच्या बंगल्यात बिबटय़ा शिरला. दमून वाहनाखाली लपला असता वनविभागाने बेशुद्ध करत त्यास जेरबंद केले.

बघ्यांचा बिबटय़ाला त्रास

शहर परिसरात बिबटय़ाचे दर्शन नवे नाही. प्रत्येक वेळी बिबटय़ा पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होते. नाशिकरोडलाही बिबटय़ाला पाहण्यासाठी तो पळेल त्या दिशेने गर्दी धावत होती. काहींनी तर त्याच्यावर दगडही भिरकावले. त्याला भ्रमणध्वनीत टिपण्यासाठी बघ्यांची चढाओढ सुरु होती. गर्दीमुळे बिथरलेल्या बिबटय़ाने दोन जणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात एक वृध्द जखमी झाले. संगीता गायकवाड सुदैवाने बचावल्या.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Leopard shock urban colony confiscated ysh

ताज्या बातम्या