नाशिक – नाशिक जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये बिबटे सहजरित्या आढळून येत असले तरी इगतपुरी तालुक्यात त्यांची संख्या अधिक आहे. बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबटे शेताच्या बांधावर, रस्त्यालगत तसेच गावांच्या आसपास कुठेही दिसत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः पावसाळा संपल्यानंतर शेतीची कामे आणि पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागत असल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
यावर्षी पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने इगतपुरी तालुक्याच्या अनेक भागांत पाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री मोटार सुरू करण्यासाठी किंवा शेतातील पाण्याची पाहणी करण्यासाठी जावे लागत आहे. बिबटे कधीही दिसत असल्याने रात्री शेतात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
इगतपुरी तालुका डोंगराळ आणि मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असलेला भाग असल्याने बिबट्यांसह विविध वन्यप्राण्यांचा अधिवास या परिसरात आहे. जंगलालगतची गावे, शेतवस्त्या आणि मानवी वस्तीच्या आसपास वन्यप्राण्यांच्या हालचाली वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्नही गंभीर होत आहे. त्यामुळे केवळ बिबट्या दिसल्यानंतर पिंजरा लावण्याऐवजी त्याच्या हालचालींचे क्षेत्र निश्चित करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.
बिबट्याचा वावर आढळल्यानंतर वनविभागाकडे माहिती देण्यासाठी नागरिक संपर्क साधतात. मात्र संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी शेतकरी व ग्रामस्थांकडून केल्या जात आहेत. तालुक्यातील वनपरिमंडळ अधिकारी कोण आणि कोणत्या भागासाठी कोणते वनपाल जबाबदार आहेत, याची स्पष्ट माहिती सामान्य नागरिकांना उपलब्ध नसल्याने तक्रार करायची कुठे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
फोन करून माहिती देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी काही नागरिकांकडून करण्यात येत आहेत. बिबट्याचा वावर असलेल्या गावांमध्ये वनविभागाने नियमित गस्त वाढवावी, नागरिकांना तातडीचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यावा आणि आवश्यक त्या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेऊन पिंजरे व कॅमेरा ट्रॅपची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
बिबट्याच्या संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी शक्यतो रात्री एकट्याने शेतात जाणे टाळावे, लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना एकटे बाहेर पाठवू नये आणि बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग अथवा गर्दी करू नये, याबाबत वनविभागाने गावागावात जनजागृती करणे आवश्यक आहे. बिबट्याच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यात वनविभागाने सक्रिय यंत्रणा उभी करून गावनिहाय पाहणी करावी, संवेदनशील भाग निश्चित करावेत, नियमित गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. वन्यजीव आणि नागरिक यांच्यातील संघर्ष वाढण्यापूर्वी वनविभागाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
