पोषण आहाराचे काम महिला बचत गटांकडे

नाशिक : करोनामुळे सर्व घटकांवर आर्थिक संकट कोसळले असताना छोटय़ा व्यावसायिकांच्या परवाना शुल्कात तीन ते दहापट दरवाढ करण्याचा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात आला. अंगणवाडय़ांना पोषण आहार पुरविण्याचे काम महिला बचत गटांना देण्यास मान्यता देण्यात आली. १० अंगणवाडय़ांचे काम एका महिला बचत गटास हा निकष घालून देण्यात आला आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध कर वसुली विभागाने सादर केलेल्या दरवाढीच्या प्रस्तावाला सर्वानी विरोध केला. या दरवाढीमुळे सलून  चालक,  पानटपरी चालक, ब्युटीपार्लर, छोटे व्यावसायिकांवर मोठा भरूदड पडणार असल्याची तक्रार करण्यात आली. लहान व्यावसायिकांवर अशी करवाढ लादणे म्हणजे दात कोरून पोट भरण्याचा प्रकार असल्याचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले. करोनामुळे सर्व घटक आर्थिक अडचणीत असताना प्रशासनाच्या या प्रस्तावाला शिवसेनेसह इतर पक्षांनी विरोध केला होता. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळला जात असल्याचे महापौरांनी जाहीर केले.  अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार पुरविण्याचे काम महिला बचत गटांना देण्यास मान्यता देण्यात आली. मध्यंतरी हे काम मध्यवर्ती स्वयंपाकगृहाकडे दिल्याने बचत गटांमध्ये नाराजी होती. हे काम बचत गटांना देण्याची मागणी राजकीय पक्षांनी लावून धरली होती. अखेर महापालिकेच्या अंगणवाडीतील बालकांना तीन वर्षांसाठी पोषण आहार पुरविण्याचे काम महिला बचत गट, महिला संस्था, मंडळांना देण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी चार कोटी ८५ लाख २९ हजार रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. एमजीएनएल गॅस कंपनीला भाडेतत्वावर जागा देण्याचा विषय मागील सभेत फेटाळला गेला होता. असे असताना तो तहकूब ठेवला गेल्याचे कसे सांगितले जाते, असा प्रश्न बोरस्ते यांनी उपस्थित केला. यावर महापौर सतीश कुलकर्णी यांनी आपण तो तहकूब ठेवल्याचे सांगितले. या कंपनीचे काम पाहून पुढील सभेत तो प्रस्ताव ठेवला जाईल, असे सांगितले. फलकांच्या परवानगीसाठी पोलीस आणि महापालिकेने ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. सुरक्षा रक्षकांचे वेतन अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. ते दिवाळीपूर्वी देण्याचे निर्देश देण्यात आले. सानुग्रह अनुदानाबाबतचा निर्णय दोन दिवसात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.