scorecardresearch

वाढत्या उकाडय़ात विजेचा लपंडाव; मान्सूनपूर्व दुरुस्ती कामांमुळे अनेक भागात कित्येक तास पुरवठा खंडित

मेच्या मध्यावर उकाडय़ाचा दाह शिखरावर पोहचला असताना शहरात दिवसभर विजेचा लपंडाव सुरू राहत असून नागरिकांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

(शहरात वीज तारांना अडथळा येणाऱ्या वृक्षांच्या फांद्या पावसाळय़ापूर्वी हटविण्याचे काम महावितरणतर्फे करण्यात येत आहे.)

नाशिक : मेच्या मध्यावर उकाडय़ाचा दाह शिखरावर पोहचला असताना शहरात दिवसभर विजेचा लपंडाव सुरू राहत असून नागरिकांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. सध्या शहरात कुठेही भारनियमन नाही. असे असताना अनेक भागात अकस्मात दोन- तीन तास वीज गायब होते. पुरवठा कधी सुरळीत होईल, याची नेमकी माहिती मिळत नाही. यामागे सर्वत्र चाललेली पावसाळापूर्व दुरुस्ती कामे हे कारण असल्याचे महावितरणकडून सांगितले जाते.
उन्हाळय़ात विजेची मागणी प्रचंड वाढल्याने मध्यंतरी महावितरणने भारनियमनाची घोषणा केली होती. काही अपवादवगळता शहरात भारनियमन करण्याची वेळ आली नाही. प्रचंड उकाडय़ाने सध्या नागरिक हैराण आहेत. पंख्यांसह इतर वातानुकुलीत यंत्रांच्या आधारे ते उन्हाळा सुसह्य करण्याच्या प्रयत्नात आहेत. दुकाने, कार्यालय आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये तोच मार्ग अनुसरला जात आहे. अशा स्थितीत वीज गायब होत असल्याने सर्वच जण त्रस्त झाले आहेत. पंचवटीच्या अमृतधाम परिसरातील काही भागात शनिवारी तसेच मंगळवारी तीन, चार तास वीज पुरवठा खंडित झाला होता. बुधवारी पुन्हा हनुमाननगर, लक्ष्मीनगरसह आसपासच्या कॉलन्यांमध्ये सकाळी १० वाजता गायब झालेली वीज चार तासानंतर परत आली. राणेनगर आणि चेतनानगर भागातही वेगळी स्थिती नव्हती. सकाळी साडेनऊला खंडित झालेला वीज पुरवठा चार तास पूर्ववत झालेला नव्हता. दिवसातील कुठल्याही वेळेत वीज पुरवठा खंडित होतो. कुठे तासाभराने तर कुठे चार ते पाच तासाने तो सुरळीत होतो.
सकाळपासून वीज गायब होत असल्याने दैनंदिन कामकाज विस्कळीत होत आहे. उकाडय़ाने घरात बसणे असह्य होते. कार्यालयीन कामकाज ठप्प होते. वातानुकुलीत यंत्रणा बंद असल्यावर ग्राहक दुकानांकडे पाठ फिरवतात. विजेच्या लपंडावामुळे दैनंदिन व्यवहार प्रभावित होत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. अनेक भागात वारंवार वीज गायब होण्यामागे भारनियमन हे कारण नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. नाशिकसह राज्यात कुठेही भारनियमन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कामे प्रगतिपथावर
पावसाळय़ात वीज पुरवठा सुरळीत राखण्यासाठी सध्या मान्सूनपूर्व दुरुस्ती कामे युध्दपातळीवर केली जात आहेत. ज्या भागात ही कामे केली जातात, तेथील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित करावा लागतो. वीज वाहिन्यांभोवतीच्या झाडांच्या फांद्या छाटणीबरोबर वीज यंत्रणांची देखभाल आणि दुरुस्ती प्रगतिपथावर असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lightning strikes rising ukadaya premonsoon work disrupted supply many areas several hours amy