नाशिक : वेळ सकाळी साडेदहाची. शहरातील मुक्त विद्यापीठाच्या महिला कक्षात दैनंदिन कामकाज नुकतेच सुरु झाले होते. अचानक त्या कक्षातून काही महिला पळतच बाहेर पडल्या. त्यांच्या चेहऱ्यावर घबराट होती. त्यांनी कक्षात घोरपड शिरल्याचे सांगितले. आणि मग सुरु झाली घोरपड पकडण्याची कसरत.महिला कक्षात घोरपड शिरल्याचे कळताच विद्यापीठाचे सेवा-सुविधा कक्षप्रमुख सुनील निकम यांनी तातडीने विद्यापीठातील पशुवैद्यकशास्र विशेषज्ञ डॉ. श्याम पाटील तसेच पशुमित्र संगणकतज्ज्ञ प्रमोद जावळे, कर्मचारी पोपट गोतरणे यांना माहिती दिली.

तिघेही तातडीने आले. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे देखील उपस्थित झाले. घोरपडही नेहमीपेक्षा वेगळ्या वातावरणात आल्याने भेदरली होती. पाटील, जावळे आणि गोतरणे यांनी सावधगिरीने महिला कक्षात प्रवेश केला. कोणतीही घाई न करता आणि घोरपडीस कुठलीही इजा न करता ताब्यात घेतले. पाच ते सात किलो वजनाच्या घोरपडीला बिनधास्तपणे हातात घेवून तिघेही महिला कक्षाबाहेर आले. कुलगुरू प्रा. सोनवणे यांच्या उपस्थितीत घोरपडला विद्यापीठाच्या विस्तीर्ण आणि जैवविविधतेने नटलेल्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. गंगापूर धरणालगतचा विद्यापीठाचा जवळपास १५० एकरचा परिसर विविध वृक्षवेलींनी नटलेला आहे. पशु-पक्षी, जलचर, उभयचर तसेच वन्यजीवांसाठी हक्काचा अधिवास त्यामुळे उपलब्ध झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घोरपड ही बिनविषारी व सरडा प्रजातीतील मोठा प्राणी असून दिसायला भयंकर असली तरी भित्री असते. मात्र संकटाची चाहूल लागल्यावर घोरपड मागील पायावर उभी राहते आणि अंग फुगवून मोठा आकार धारण करते. जोराने फुस्कारते, शेपटीचा तडाखा देते किंवा दातांनी चावा घेते. त्यामुळे ती पाहताक्षणी घाबरणं स्वाभाविक असलं, तरी प्रत्यक्षात ती निर्दोष आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे.