शिवसेना पक्ष सत्तेत असला तरी आम्ही सध्या देणाऱ्यांच्या नव्हे तर मागणाऱ्यांच्या भूमिकेत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पावसाळी अधिवेशनादरम्यान  कर्जमुक्तीसाठी ‘आरपार’ची लढाई लढणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी नाशिकमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मित्रपक्ष असणाऱ्या भाजपवर टिका केली. शेतकऱ्यांच्या संपात राज्य सरकार फूट पाडत असून त्यांच्या व्यथेचे राजकारण करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी मुंबई-नाशिक दरम्यान नियोजित समृध्दी महामार्गाच्या मुद्यावरही शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी असेल, असा विश्वास शिवसेनेने दिला. समृद्ध मार्गाच्या  नावाखाली सरकारला शेतकऱ्यांची थडगी आम्ही बांधू देणार नाही, अशा शब्दात शिवसेनेने पुन्हा एकदा समृध्दी महामार्गाविरोधातील भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.

उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाने १९ मे रोजी नाशिकमध्ये शेतकरी अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी, काँग्रेसचे नेते विनायकदादा पाटील यांच्यासह शेतकऱ्यांचे प्रतिनिधीही सहभाग घेणार आहेत.