नाशिक – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी येवल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारांची निवड करतांना निवडून येण्याची क्षमता, नागरिकांशी जुळलेली नाळ आणि इच्छुकांचे काम, पक्षातील अन्य पदाधिकाऱ्याचे मत या चतु:सुत्रीवर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत.

मंत्री छगन भुजबळ हे आजारी असल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार पंकज भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, पंढरीनाथ थोरे, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, येवला बाजार समितीचे सभापती वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, किसनकाका धनगे आदींची त्यांना साथ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला अतिशय चांगले वातावरण असून इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याचे समीर भुजबळ यांनी सांगितले. सर्वांनाच संधी देणे शक्य होणार नाही. ज्यांच्याकडे निवडणुक जिंकण्याची गुणवत्ता , दांडगा जनसंपर्क असलेल्या उमेदवारांना सर्वानुमते संधी देण्यात येईल. याबाबत अंतिम निर्णय हा मंत्री छगन भुजबळ हे घेणार आहेत. त्यामुळे ज्यांना संधी मिळणार नाही, त्यांनी निराश न होता आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर युती करायची की नाही याचा सर्वस्वी निर्णय स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या वतीने दिलेला आहे. त्यामुळे सर्व परिस्थिती बघून ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असे समीर भुजबळ यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या कागदपत्रांबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.