त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेशावरून बुधवारी झालेली अडवणूक व मारहाणप्रकरणी स्वराज्य महिला संघटनेने दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी ३०० पेक्षा अधिक ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करत तिघांना ताब्यात घेतले. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी स्थानिकांनी कडकडीत बंद पाळला. गावातील दुकाने, हॉटेलसह सर्व व्यवहार बंद होते. चौकाचौकात ‘बा त्र्यंबकराया आम्ही तुझ्या सेवेत कमी पडलो. आम्हाला माफ कर’ असे फलक लावण्यात आले होते.
बुधवारी मंदिरात झालेल्या प्रकारानंतर पोलिसांनी माजी नगराध्यक्षांसह सुमारे ३०० जणांविरुद्ध मारहाण, विनयभंगसारखे गुन्हे दाखल केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यातच रात्री तीन जणांना पोलिसांनी अटक केल्याचे कळताच स्थानिकांनी गुरुवारी त्र्यंबक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यातच गुरुवारी सकाळी स्वराज्य संघटनेच्या चार महिलांनी पोलीस बंदोबस्तात मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्याचे कळताच ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले. विश्वस्तांना आपली परंपरा टिकवता आली नाही, असा आरोप करत चौकाचौकात ‘त्र्यंबकराजाच्या सेवेत विघ्न आल्याने क्षमा कर’ असे फलक लावण्यात आले. बंदमुळे बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर परिसरात पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
बुधवारी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वराज्य संघटनेच्या महिलांना धक्काबुक्की, मारहाण झाल्याने सर्व स्तरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. गुरुवारी सकाळी संघटनेच्या दबावापुढे नमते घेत पोलीस प्रशासन आणि देवस्थान समिती, विश्वस्त यांनी महिलांना गर्भगृहात जाण्यास अनुमती दिली. गर्भगृहात जाऊन महिलांनी दर्शन घेतल्याची माहिती कळताच स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. विश्वस्तांनी एकी न ठेवत आपली परंपरा न जपल्याने बाहेरील व्यक्ती येऊन ही परंपरा मोडू शकली, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. स्थानिकांच्या भावना समजून घेण्यात अन्य नागरिक, समाज माध्यमे कमी पडली. महिलांना प्रवेश का नाही याबद्दलच्या वैज्ञानिक, सामाजिक कारणांचा शोध न घेता त्र्यंबकवासीयांवर आरोप झाले. केवळ प्रसिदद्धी आणि स्टंटबाजीच्या नादात येथील भाविकांच्या श्रद्धेचा बाजार मांडला गेला, अशी भावना एका ग्रामस्थाने व्यक्त केली. पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी महिलांना मंदिर प्रवेशासाठी विरोध कधीच नव्हता, असे मत मांडले. त्र्यंबक येथील शिवमंदिर तांत्रिक पूजेसाठी आहे. ही पूजा स्त्रिया करू शकत नाही. म्हणून त्यांना या ठिकाणी काही र्निबध घालण्यात आले होते. शिवाची आराधना शक्तीशिवाय होऊ शकत नाही हे आम्हाला मान्य आहे. मात्र धार्मिक कारणांचा विचार होणे गरजेचे होते. सरकार या ठिकाणी स्थानिक नागरिकांची भावना समजून घ्यायला कमी पडले याचा खेद वाटतो. शहरात भाजपचा वरचष्मा असताना स्थानिकांचे म्हणणे कोणी का ऐकले नाही? सर्वोच्च न्यायालय घटनेचा आधार घेत आहे तर घटना खूप आधीच झाली. त्यात स्त्री-पुरुष असा उल्लेख न करता वर्णद्वेषावर भाष्य करण्यात आले आहे. महिलांना गर्भगृहात प्रवेश का नाही, याचा सर्वागाने विचार होणे गरजेचे होते. देवस्थान ट्रस्ट आणि विश्वस्त मंडळी ही परपंरा टिकवण्यात अपयशी ठरले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
देवस्थानच्या विश्वस्तांपैकी बहुतांश विश्वस्तांनी या विषयावर भाष्य करणे टाळले. मंदिराचे त्रिकाल पूजक डॉ. सत्यप्रिय शुक्ल यांनी देवस्थानची भूमिका स्पष्ट केली. महिला व पुरुष हा विषय गर्भगृह प्रवेशासाठी कधीच नव्हता.
अन्य काही कारणास्तव तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत लहान जागेतील गर्भगृहात प्रवेशासाठी बंदी करण्यात आली होती. गर्भगृहाशी स्थानिकांची अस्मिता जोडलेली असली तरी सरकार किंवा न्यायालय धर्म, भावना, परंपरा याला महत्त्व देत नाही. त्या विषयावर भाष्य करणे व्यर्थ ठरते. महिलांचा गर्भगृह प्रवेश झाला असला तरी प्रसिद्धी किंवा स्टंटबाजी करणाऱ्या महिलांव्यतिरिक्त कुठलीच सर्वसामान्य महिला या भागात प्रवेश करणार नाही, असा विश्वास डॉ. शुक्ल यांनी व्यक्त केला.



