नाशिक – महाराष्ट्रातील गडकिल्ले म्हणजे ऐतिहासीक खजिना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांना साथ देणाऱ्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांविषयी प्रत्येक मराठी माणसाला निश्चितच अभिमान आहे. त्यामुळेच अशा गडकिल्ल्यांसंदर्भात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यांचे मन कासावीस होते. लोहगड येथे अलिकडेच घडलेल्या घटनेमुळेही शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी अस्वस्थ झाले आहेत. लोहगडावर झालेला प्रकार दुर्देवी असताना त्याविषयी समाज माध्यमांमध्ये वेगवेगळा मजकूर येत असल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. यासंदर्भात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने या घटनेचे निमित्त करुन लोहगडाची होणारी बदनामी थांबविण्याची मागणी केली आहे.

बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवालचा १८ जून रोजी लोहगडावरुन दरीत पडून मृत्यू झाला. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनीच केतनला दरीत ढकलल्याचा संशय व्यक्त होत असून सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. संपूर्ण देशात हे प्रकरण गाजत असताना या प्रकरणाचे निमित्त करुन काही मीम्स समाज माध्यमांत फिरत आहेत. त्याबद्दल अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात महासंघाने निवेदनातून आपली भूमिका मांडली आहे.

महासंघाने लोहगडावरुन घडलेली घटना दुर्देवी आणि वेदनादायी असल्याचे म्हटले आहे या घटनेनंतर समाज माध्यमांवर तसेच इतर माध्यमांतून लोहगडाविषयी आक्षेपार्ह, बदनामीकारक आणि अवमानकारक भाष्य करण्यात येत आहे. ही बाब अत्यंत निषेधार्ह असून ती तात्काळ थांबविण्यात यावी, असे आवाहनही अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ तसेच समस्त गडप्रेमी आणि शिवप्रेमी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वाभिमान हरवलेल्या समाजाचे हे प्रातिनिधीक दर्शन असल्याचे महासंघाने नमूद केले आहे..आपले किल्ले हे जागतिक वारसास्थळ आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचे साक्षीदार आहेत. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न या घटनेतून केला जात आहे. लोहगड हे केवळ पर्यटनस्थळ नसून, महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाचा एक ऐतिहासीक वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडीत पवित्र श्रध्दास्थान आहे. अशा गडाच्या संदर्भात घडलेल्या एका दुर्देवी घटनेचे निमित्त करुन समाज माध्यमांमध्ये विविध रिल्स, मीम्स, आणि अवमानकारक आशय प्रसारित केला जात आहे. ही प्रवृत्ती अत्यंत खेदजनक असून आपल्या ऐतिहासीक वारशाचा आणि समाजाच्या भावनांचा अनादर करणारी आहे. म्हणून अशा प्रकारचे आक्षेपार्ह दिशाभूल करणारे आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरुध्द संबंधित यंत्रणांनी तातडीने योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. आपल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा सन्मान राखणे आणि त्यांचे पावित्र्य जपणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने अध्यक्ष उमेश झिरपे, कार्याध्यक्ष ह्रिषीकेश यादव, सचिव डाॅ. राहुल वारंगे यांची स्वाक्षरी आहे.

सचिव डाॅ. राहुल वारंगे यांनी, कोणत्या कारणाने लोहगडाशी संबंधित त्या ठिकाणाला आपण प्रसिध्दी देत आहोत, त्याचे भान सर्वांनी ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. लोहगडाविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिध्द किंवा प्रसारित करु नये, यासाठी महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.